पक्ष निधी न दिल्यामुळेच चुकीचे आरोप, टिप्परचालकांचे महापालिकेला निवेदन
schedule27 Dec 24 person by visibility 65 categoryमहानगरपालिका
पक्ष निधी न दिल्यामुळेच चुकीचे आरोप, टिप्परचालकांचे महापालिकेला निवेदन
महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : टिप्पर चालकांच्या वेतन व अन्य मागण्यावरुन गेले काही दिवस आम आदमी पक्षातर्फे ठेकेदार व महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर आक्षेप नोंदविले असताना गुरुवारी त्याला वेगळे वळण लागले. टिप्पर चालकांनी एकत्र येत वाहनचालकांची कोणत्याही ठेकेदार कंपनीबाबत तक्रार नाही. ठेकेदारमार्फत कोणत्याही प्रकारची चुकीचे देयके सादर केले नाहीत.किमान वेतनाप्रमाणे वेतन दिले जाते. वाहनचालकांचा विमा उतरविला आहे पीएफ भरला आहे असे निवेदन सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांना दिले. तसेच त्यांनी आंदोलन करणाऱ्या पक्षाविषयी निवेदनात गंभीर आरोप केले आहेत.
टिप्पर चालकांनी निवेदनात, ‘नवीन टेंडर किमान वेतनप्रमाणे आमच्या पक्षामुळे झाले आहे. आमच्या पक्षामुळे तुम्हा सर्व वाहनचालकांना रोजगार दिला. याबाबत तुम्ही सर्व वाहनचालकांनी प्रत्येकाने प्रति महिना ५०० रुपये पक्ष निधी जमा करावे असे सांगितले. वाहनचालकांनी पक्ष निधीची दखल न घेतल्यामुळेच आरोप करण्यात येत आहेत.’असे म्हटले आहे.
आम आदमी पक्षातर्फे टिप्पर चालकांच्या नेमणुकीवरुन ठेकेदारावर आरोप केले होते. सहा ठेकेदार कंपन्याकडून किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नाही. चुकीचे हजेरीपत्रकासह पीएफचे पैसे भरल्याचे रेकॉर्ड नसल्याचा आरोप केला होता. तसेच यासंदर्भातील कागदपत्रे सापडत नाहीत हे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या निदर्शनास आणले होते. टिप्पर चालकांची संख्या कमी असताना जादा दाखवून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप ठेकेदार कंपन्यावर केला आहे. सहा ठेकेदार कंपन्यामध्ये काही माजी नगरसेवकांचा सहभाग असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान टिप्पर चालकांनी गुरुवारी एकत्र येत आपचे नाव न घेता त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत, रणजित बुचडे, किशोर शिंदे, विशाल देवकुळे, बाजीराव माळी, दीपक कांबळे, किशोर शिंदे,रोहनराज शिर्के, कुमार साठे आदींनी निवेदन सादर केले.