भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरा
schedule26 Dec 24 person by visibility 18 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. बिंदू चौक येथील भाकप कार्यालय येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. झेंडावंदन ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे म्हणाले, भाकपची स्थापना १९२५ मध्ये झाली. या पक्षाचे फाउंडर मेंबर शहीद लाला लजपतराय आणि शहीद भगतसिंग यासारखे क्रांतिकारी नेते होते. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेला होता. अनेक कॉम्रेड्स या चळवळीत शहीद झालेले आहेत. ही परंपरा आपली कायम राहिलेली आहे. आता देशामध्ये ज्यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेला नव्हता ते सत्तेवर आहेत. त्यांचा खरा चेहरा उघड करून जनतेला दाखवणे, हे आपले कर्तव्य आहे.
शहर सेक्रेटरी रघुनाथ कांबळे म्हणाले,भाकप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. सध्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण चालू आहे. ते संपवणे ही काळाची व आपली प्राथमिक जबाबदारी आहे. त्याप्रमाणे आपण व्यवहार केला पाहिजे. यावेळेस बोलताना कॉम्रेड दिलीप पवार म्हणाले, वेगवेगळे कार्यक्रम, जन आंदोलने व जनसंघर्ष याद्वारे पक्षाचे शताब्दी वर्ष साजरे करू. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्षाचे विचार रुजवण्याचे काम आपण या वर्षात करू या.
झेंडा गीत कॉम्रेड प्रशांत आंबी आणि शाहीर सदाशिव निकम यांनी गायले. याप्रसंगी कॉम्रेड एस बी पाटील, बाबा ढेरे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, आय.बी. मुंशी, अजय अकोलकर रघुनाथ गणेशाचार्य, विश्वास पाटील, उमेश पानसरे, दीपक निंबाळकर,धीरज कटारे, कृष्णा पानसे ,श्रीकांत कोळी, अशोक यादव उपस्थित होते.