जिल्हयात स्वच्छता-पर्यावरण- आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविणार- प्रशासक कार्तिकेयन एस.
schedule23 May 25 person by visibility 31 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात स्वच्छता, पर्यावरण व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध उपक्रमांची गावस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या पर्यावरण व स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम होत आहेत. यामध्ये २८ मे रोजी मासिक पाळी व्यवस्थापन दिन आहे. किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळी व्यवस्थापन , स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे.२२ मे ते पाच जून या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन साजरा होणार आहे. या कालावधीत पर्यावरण दिना निमित्त प्लास्टीक प्रदूषण निर्मूलन मोहीम, स्वच्छतेची प्रतिज्ञा, सार्वजनिक ठिकाणी व पाण्याच्या स्त्रोतांच्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात येईल. तसेच प्लास्टीक संकलन, एकल वापराच्या प्लास्टीकचा वापर कमी करणे, कच-याचे वर्गीकरण याविषयी जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेत जमा झालेले प्लास्टिक, तालुका प्लास्टिक संकलन केंद्रात प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेनुसार प्लास्टीक कच-यापासुन उपयोगी वस्तू तयार करण्यात येणार आहेत.
२१ जून रोजी जागतिक योग दिन जिल्हयातील सर्व गावांमध्ये साजरा केला जाणार आहे. यंदा एक पृथ्वी, एक आरोग्य अशी संकल्पना आहे. योगसत्राच्या माध्यमातून नैसर्गिक जीवनशैली व मानसिक आरोग्याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. गावातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुविधाच्या ठिकाणी बैठक घेवून, या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविणेत येणार आहे. यानंतर याच ठिकाणी योग सत्र घेण्यात येणार आहे.