मुश्रीफांना मिळाले हत्तीचे बळ, केपींना बघायचयं अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी !
schedule23 May 25 person by visibility 207 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत शिवबंधन बांधलेल्या माजी आमदार सहा महिन्यातच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार के. पी. पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राजकीय टोलेबाजीने गाजला. मुदाळ येथील प. बा. पाटील शिक्षक संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमात मंत्री मु्श्रीफ यांनी माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील या ‘मेहुणे-पाहुणे’यांना एकत्र आणणार असल्याचे सांगितले. तर के. पी. यांनी, ‘अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे.’असे सांगितले. पवार यांनी के पी यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात घडयाळ आहे असे सांगताच कार्यक्रमस्थळी एकच हंशा पिकला.
याप्रसंगी बोलताना के. पी. पाटील म्हणले, ‘मतदारसंघातील ९० हजार मते प्रत्येकवेळी माझ्यासोबत आहे. राधानगरी तालुक्याने मला नेहमीच साथ दिली. पंचायत समिती, जिल्हा परिषद, गोकुळ, पंचायत समिती, बाजार समितीच्या सगळया निवडणुका आम्ही जिंकतो. मी, स्वाभिमानाने राजकारण करणारा आहे. कार्यकर्ते, लोकांना न्याय देण्यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. काही जण घरवापसी म्हणत आहेत, पण मी प्रारंभापासूनच राष्ट्रवादीत आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना सांगून इतर पक्षात प्रवेश केला. निवडणुकीत अनेकजण आम्हाला सोडून गेले. कोण अपक्ष लढले. अनेकांची नाव घेऊन मी त्यांना मोठं करत नाही. आता, आमचं भविष्य काय? अशी विचारणा होते. आमचं भविष्य एकच आहे, ते म्हणजे अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बघायचं. मंत्री हसन मुश्रीफ यांचा आम्हाला मोठा आधार आहे. ते कार्यकर्त्यांना सांभाळतात.’
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘के. पी. पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाने मला मोठा भाऊ परत मिळाला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने मला हत्तीचे बळ मिळाले आहे. के. पी. व ए. वाय. पाटील यांच्यामुळेच मी जिल्हयाचा नेता झालो. त्या दोघांचे इतके का बिनसले हे कळायला मार्ग नाही. या दोघांमधील वाद मिटवू. त्यांना पक्षातून बाहेर सोडणार नाही. के. पी. पाटील व ए. वाय पाटील यांना एकत्र आणलं पाहिजे असे म्हटल्यावर के. पी. माझ्यावर खवळून उठतील. के. पी हे रोखठोक स्वभावाचे आहेत. एखादे काम होणार नसेल तर तोंडावर स्पष्टपणे सांगणार. मात्र राजकारणात इतका स्पष्टवक्तेपणा, असा स्वभाव चालत नाही. लोकांना काम करु या बघू या असं सांगावे लागते. भविष्यात के. पी. आपल्या स्वभावात बदल करतील.’
उपमुख्यमंत्री पवार यांनी के. पी. यांना समजुतीचा सल्ला देताना ‘आता भावकी, मेहुणे, पाव्हणे हे वाद लवकर मिटवावेत. राजकारण बेरजेचे करायचे असते. वादाचा फटका तुम्हाला बसतो, फायदा इतरांना होतो.’हे निदर्शनास आणले. ‘विधानसभेला के. पी. यांनी मशाल हाती घेतली. त्यांनी कितीही मशाली पेटविल्या तरी त्यांच्या हृदयात घडयाळ आहे. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश म्हणजे, ‘सुबहा का भुला, शाम को घर आया’असा प्रकार आहे. राधानगरी भुदरगडला केपी. यांची गरज आहे. त्यांनी बिद्री कारखाना राज्यात एक नंबर चालविला आहे. ते, शरद पवार यांच्या तालीमीत तयार झाले आहेत.’असे उद्गारही अजित पवार यांनी काढले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भय्या माने, बिद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, भोगावती कारखान्याचे व्हाईस चेअरमन धैर्यशील पाटील कौलवकर, बिद्रीचे संचालक पंडितराव केणे, गोकुळचे संचाकल प्रा. किसन चौगले, युवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई, बिद्रीचे संचालक धनाजी देसाई, भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रस अध्यक्ष विश्वनाथ कुंभार, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळचे संचालक रणजीत पाटील यांनी प्रास्ताविक केले.