शिवाजी विद्यापीठात बुधवारी तीन मोठ्या पुरस्कारांचे वितरण, सदानंद मोरेंची प्रमुख उपस्थिती
schedule07 Apr 25 person by visibility 332 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात बुधवारी, (९ एप्रिल २०२५) तीन प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचा वितरण समारंभ होत आहे. या समारंभासाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. तीनही कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळयासंबंधी सांगताना कुलगुरू डी. टी. शिर्के म्हणाले, ‘सन २०२५ चा ”प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार”लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दुपारी चार वाजता होणार आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, रोख रक्कम एक लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार कणबरकर कुटुंबींयांनी विद्यापीठाकडे ठेव स्वरुपात ठेवलेल्या रकमेतील व्याजातून दिला जातो.’
संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी शिवाजी विद्यापीठाने ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’सुरू केला आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. २०२४ वर्षासाठीचा पहिला पुरस्कार तळाशी येथील मारुतीराव जाधव यांना सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला होता. दरम्यान मारुतीराव जाधव यांचे २९ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले. हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांकडे प्रदान करण्यात येणार आहे. जाधव यांनी, शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी ’तुकारामबोवांच्या गाथेचे निरुपण (खंड एक आणि दोन) हा सुमारे १८०० पानांचा आणि कान्होबाची गाथा हा सुमारे ४०० पानांचा ग्रंथ सिद्ध केला. हा पुरस्कार वितरण सकाळी ११ वाजता होणार आहे. अशी माहिती मराठी विभागप्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.
विद्यापीठातर्फे देण्यात येणारा पहिला ‘सद्गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार’ कानपूर आयआयटी येथील प्रा. समीर चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रा. चव्हाण हे गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी ’अखई ते जाले’ (तुकाराम : हिंदुस्थानी परिवेशात) हा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला आहे. हा पुरस्कार सकाळी ११ वाजता प्रदान करण्यात येणार आहे. सोलापूर येथील डॉ. गौरी कहाते यांच्याकडून त्यांचे वडील स्वर्गीय सद्गगुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यापीठास दिलेल्या देणगीमधून हा पुरस्कार सुरू केला आहे.
पत्रकार परिषेदला प्रकुलगुरू प्रमोद पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूलयमापन मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव, अधिष्ठात श्रीकृष्ण महाजन, प्राचार्य बी. ए. खोत, उपकुलसचिव वैभव ढेरे, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर उपस्थित होते.