संजय घाटगे, अंबरिश घाटगेंच्या हाती कमळ ! मुंबईत झाला पक्षप्रवेश !!
schedule15 Apr 25 person by visibility 397 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि संचालक अंबरिश घाटगे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत पक्षप्रवेश झाला. घाडगे यांच्या पक्षप्रवेशाची गेल्या काही महिन्यापासून चर्चा सुरू होती. त्यांनी कोल्हापुरात काही महिन्यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. घाटगे यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ही उपस्थिती होती. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेशावळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कागलच्या राजकारणामध्ये घाटगे पिता पुत्रांनी विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना साथ दिली होती. तर लोकसभेला ते महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात होते. कागलचे राजकारण हे नेहमीच गटातटाभोवती फिरत असते. भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे यांना विधानसभेवेळी महायुतीचे उमेदवारी मिळाली नाही. महायुती अंतर्गत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री मुश्रीफ यांना उमेदवारी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीला समरजीतसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. तर विधानसभा निवडणुकीत संजयसिंह घाटगे व अंबरिश घाटगे यांनी मुश्रीफ यांचा प्रचार केला होता. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर संजय घाटगे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू होती.