पाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाट, शाखा अभियंत्याविरोधात सीईओकडे तक्रार
schedule15 Apr 25 person by visibility 312 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण पाणी पुरवठयाच्या जुन्या पाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. यासंबंधी शाखा अभियंत्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. इमारत उपविभागातील उपअभियंता सदाशिव येजरे यांनी शाखा अभियंता हुपरे यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनाही यासंबंधी कळविले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ‘कागलकर हाऊस परिसर येथे आरोग्य भांडारगृह इमारत आहे. या इमारतीच्या पाठीमागील बाजूस ग्रामीण पाणी पुरवठयाच्या जुन्या तीन पाण्याच्या टाक्या बरेच दिवस पडून होत्या. या टाक्या शाखा अभियंता हुपरे यांनी पाच व सहा एप्रिल २०२५ या दोन दिवसाच्या कालावधीत गॅस कटरने कट केल्या. सु्ट्टीच्या कालावधीत हा प्रकार केला असून जिल्हा परिषद मालकीच्या जागेतून अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. गॅस कटरने कट करणे व स्थलांतर याबाबत कार्यालयाची पूर्वपरवानगी घेतली नाही. तसेच कार्यालयास कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. संबंधितांवर योग्य कार्यवाही व्हावी.’