हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेकडून सरकारकडे सादर ! कोल्हापूरसाठी लवकरच तीन आनंदाच्या बातम्या !!
schedule08 Aug 25 person by visibility 501 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही हद्दवाढ अपेक्षित असल्याचे यापूर्वीच म्हटले आहे. समर्थक-विरोधक अशा सर्वांना बरोबर घेऊन गेली चार महिने हद्दवाढीसंबंधी सकारात्मक काम सुरू आहे. कोल्हापूर शहरालगतच्या आठ गावांच्या समावेशासह हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेकडून राज्य सरकारकडे सादर झाला आहे. ’ असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. आगामी काळात हद्दवाढीसह कोल्हापुरात शंभर एकर जागेत आयटीपार्क आणि उद्योगक्षेत्रासाठी प्रतियुनिट सहा ते सात रुपये दराने वीज पुरवठा अशा तीन आनंदाच्या बातम्या लवकरच कळतील. आता हद्दवाढ कोणी रोखू शकत नाही ’असेही ते म्हणाले.
‘शाश्वत आणि सर्वांगिण विकासासाठी‘ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’या संस्थेच्या प्रथम कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी ( आठ ऑगस्ट २०२५) पार पडला. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोक माने, कोल्हापूर क्रीडा प्रतिष्ठानचे बाळ पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार शाहू महाराज समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. रेसिडेन्सी क्लब येथे कार्यक्रम झाला. या समारंभात सर्वच नेतेमंडळींनी ‘कोल्हापूर फर्स्ट’च्या माध्यमातून शहर विकासाच्या प्रकल्पांना गती मिळत असल्याचे नमूद केले.
क्षीरसागर म्हणाले, ‘ पायाभूत सुविधा, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा सर्वच पातळीवर कोल्हापूरचा विकास साधावा यासाठी प्रयत्नशील आहे. मित्रा संस्थेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी काम सुरू आहे. उद्योग-व्यावसायिकांना नजीकच्या काळात कमी दराने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय कोल्हापूरच्या विकासाचा महत्वपूर्ण टप्पा म्हणून शेंडा पार्क परिसरात १०० एकर जागेत आयटी पार्क होणार आहे. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला सांगरुळ परिसरातील शंभर एकर जागा दिली जाणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग उपयुक्त् आहे. त्यासाठीच मी समर्थन करत आहे. याशिवाय कोल्हापूर परिसरात जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्चून रिंगरोड तयार करण्याचे नियोजित आहे.‘
पालकमंत्री आबिटकर यांनी, ‘कोल्हापूर फर्स्ट’ने शहर व जिल्हयाच्या विकासाची चांगली भूमिका घेतली असल्याचे कौतुकोद्गगार काढले. अध्यक्षस्थानावरुन बोलताना खासदार म्हणाले, ‘सगळयांना एकत्र करुन कोल्हापूर फर्स्ट शहर विकासाच्या विविध प्रकल्पावर काम करत आहे. कोल्हापूर फर्स्टचे हे काम कौतुकास्पद आहे.’याप्रसंगी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन यांनी ‘कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारणी, प्रशासन, जनता आणि प्रसारमाध्यमे या चार घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे कोल्हापूर फर्स्टने निश्चित केले आहे. विकासात्मक दृष्टिकोन असलेल्या चौदा संस्था सुरुवातील सामील होत्या. आता संस्थेच्या कामकाजात सहभागी संस्थांची संख्या २१ वर पोहोचली आहे. विकास कामांचे प्राधान्यक्रम ठरवून संस्था कार्यरत आहे.’ उपाध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत यांनी संस्थानकालीन न्यायदान पद्धत ते सर्किट बेंच स्थापनेपर्यंतचा इतिहास उलगडला. सर्किट बेंचनंतर आता कोल्हापूरला महाराष्ट्राचा सातवा महसुली विभाग म्हणून मान्यता मिळावी यासाठी सारे प्रयत्न करू या ’अशी भूमिका मांडली.
कार्यक्रमाला कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिशनचे कमलाकांत कुलकर्णी, कारखानदार मोहन कुशिरे, हरिश्चंद्र धोत्रे, स्वरुप कदम, राजू पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील हॉटेल असोसिएशनचे सचिन शानबाग, अरुण चोपदार, आस्माचे अध्यक्ष अमरदीप पाटील, अजय कोराणे, डॉ. मनीष नागावकर, डॉ. आरती जाधव, डॉ. अण्णासाहेब गुरव, जयदीप बागी आदी उपस्थित होते. प्रा. क्षितीजा ताशी यांनी सूत्रसंचालन केले.
………………….
कोल्हापूर फर्स्टची कार्यकारिणी अन् विशेष निमंत्रित सदस्य
कोल्हापूर फर्स्टच्या चेअरमनपदी सुरेंद्र जैन, व्हाईस चेअरमन म्हणून अॅड. सर्जेराव खोत, डॉ. अमोल कोडोलीकर, प्रताप पाटील यांची निवड झाली. सचिवपदी बाबासो कोंडेकर, सहसचिवपदी उज्ज्वल नागेशकर, सीएस जयदीप पाटील, खजानिसपदी सीएस पद्मसिंह पाटील, सहखजानिसपदी सीए नितीन हरगुडे यांची निवड झाल आहे. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नितीन वाडीकर, सचिन शिरगावकर, डॉ. अशोक भूपाळी, सचिन मेनन, सतीश घाटगे, करुणाकर नायर, कृष्णा पाटील, सिद्धार्थ लाटकर, विद्यानंद बेडेकर, गिरीश वझे, सतीश डकरे, अमर सासने, शांताराम सुर्वे, संजय जोशी आदींचा समावेश आहे.