केएमटीच्या १५६ रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याचा निर्णय- राजेश क्षीरसागर
schedule07 Aug 25 person by visibility 1752 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील रिक्त असणाऱ्या चालक- वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीवरील जेष्ठ व विनियमातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावास सरकारने मान्यता दिली आहे. नगरविकास व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून केएमटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गेले ३० ते ३५ वर्षे रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार क्षीरसागर यांच्या यशस्वी पाठ पुराव्यामुळेच महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील ५०८ रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले होते. यावेळी काही तांत्रिक त्रुटीमुळे के.एम.टी.तील १५६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी झाला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांचे भावी आयुष्य सुधरावे, त्यांना न्याय मिळावा, म्हणून सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या १५६ कर्मचाऱ्यांचे जीवनमान निश्चितच सुधारणार असून, घेतलेल्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि महायुतीचे आभार मानल असल्याचेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे. सेवेत कायम झाल्याचे कळतात के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आमदार क्षीरसागर यांची भेट घेवून मनपूर्वक जाहीर आभार मानले. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाजवळ फटाकांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.