तुमच्यात काही मतभेद असतील तर सांगा, मी मिटवतो ! शाहू महाराजांची कोपरखळी, शिवसेना नेत्यांनाही हसू आवरेना !!
schedule09 Aug 25 person by visibility 197 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे ग्रामीण भागातील. राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करतात.तर आमदार राजेश क्षीरसागर हे शहराचे. कोल्हापूर उत्तरचे आमदार. दोघांनी मिळून विकासाच्या वाटेवरुन पुढे जायचे आहे. दोघांतही काही मतभेद असतील असे वाटत नाही. आणि जर काही मतभेद असतील तर मला सांगा, मी मिटवतो...’
अशा शब्दांत महाविकास आघाडीचे खासदार शाहू महाराज यांची ‘कोल्हापूर फर्स्ट’च्या व्यासपीठावर शुक्रवारी सायंकाळी फटकेबाजी करत कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. शाहू महाराज यांच्या फटकेबाजीवर सभागृहातील उपस्थितांनी दाद दिली तर पालकमंत्री आबिटकर आणि आमदार क्षीरसागर यांनाही हसू आवरता आले नाही. त्यांनी, ‘आमच्यात कसलेही मतभेद नाहीत, आम्ही एकत्र आहोत’असे सांगताच पुन्हा एकदा सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. ‘शाश्वत आणि सर्वांगिण विकासासाठी’ हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’चा पहिला पदग्रहण समारंभ येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये झाला. पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर, आमदार अशोक माने, कोल्हापूर क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन यांनी, विकासाचा दृष्टीकोन असणाऱ्या कोल्हापुरातील जवळपास २१ संस्था ‘कोल्हापूर फर्स्ट’शी निगडीत आहेत. दहा विकास प्रकल्पावर कोल्हापूर फर्स्ट काम करत असल्याचे भाषणात सांगितले. आमदार क्षीरसागर यांनी, ‘शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ माझा कसलाही स्वार्थ नाही. शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा त्रिकोण साधणारा मार्ग आहे.म्हणून आपण शक्तीपीठचे समर्थन करत आहेत.’असे भाषणात नमूद केले. या समारंभासाठी पालकमंत्री आबिटकर उशिरा दाखल झाले. त्यांनीही भाषणात, कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी साऱ्यांनी एकत्र येऊन काम करू या असे नमूद केले. अध्यक्षस्थानावरुन बोलताना खासदार शाहू महाराज यांनी, ‘कोल्हापूर फर्स्ट’ने विकासाच्या प्रकल्पात शेती आणि शेतकऱ्यांचा समावेश करावा. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले तरच जिल्हयाची, राज्याची प्रगती होते. कोल्हापूर फर्स्टच्या कार्यक्रमात शेतकरी दिसायला हवेत.’अशी सूचना केली. त्यावर कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन जैन यांनी ‘निश्चित त्यांचा समावेश करू’असे महाराजांना सांगितले.
भाषणात खासदार शाहू महाराज यांनी, पालकमंत्री आबिटकर आणि आमदार क्षीरसागर हे ग्रामीण आणि शहरी भागाचे प्रतिनिधीत्व करत असले तरी दोघांनी मिळून पुढे जायचे आहे. तुमच्यात काही मतभेद असतील असे मला वाटत नाही. मतभेद असतील तर सांगा, मी मिटवतो.’असे म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला. भाषणात त्यांनी सध्या जिल्ह्यातील विविध प्रश्नावरील श्रेयवाद, राजकीय नेते मंडळीतील कुरघोडी या अनुषंगाने भाष्य केले. ते म्हणाले, ‘कधी-कधी सगळे जण एकत्र येऊन कामे होत नाहीत. ते स्वाभाविकही आहे. कारण स्वभाव असतो, एकेकांचा. लोकप्रतिनिधी म्हणून साऱ्यांनी एकत्र काम करत राहायचं. लोकांची कामे होत राहतात. श्रेयवादाचे राजकारण करायचे नाही. श्रेयवाद कोण घेत नाही, खरे श्रेय जनतेला असते.’अशी मिश्लिक टिप्पणी केली. त्यांची ही कोपरखळी नेमका कोणाला ? महायुतीतील नेते मंडळींना की महाविकास आघाडीतील नेत्यांना ? अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.