शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची स्थापना ! अध्यक्षपदी डॉ. निखिल गायकवाड, उपाध्यक्षपदी सुजाता कुलकर्णी !!
schedule14 Sep 25 person by visibility 543 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या (एबीआरएसएम) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय कार्यकारिणी अध्यक्षपदी प्रा. डॉ. निखिल गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सुजाता कुलकर्णी, महामंत्रीपदी डॉ. शार्दुल सेलूकर, कोषाध्यक्षपदी डॉ. रामचंद्र पवार यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या कोल्हापूर युनिटची शिवाजी विद्यापीठ येथे स्थापना करण्यात आली. एबीआरएसएम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. प्रदीप खेडकर, महासंघाचे सहमंत्री डॉ. दिलीप अजुने, डॉ तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीला तीन जिल्ह्यातील ९० पेक्षा अधिक प्राध्यापक उपस्थित होते. यवेळी डॉ. खेडकर यांनी महासंघाचे ध्येयधोरणे शैक्षणिक वातावरणात महत्त्वाची आहेत यासंबंधी विवेचन केले. केजी टू पीजी पर्यंत शैक्षणिक, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या संघटनेची मदत होणार आहे तसेच हा एबीआरएसएम महासंघ केवळ आंदोलन करण्यासाठी नसून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये राष्ट्रीय मूल्य रुजविणे, राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपले योगदान आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उत्तम प्रकारे राबविणे यासाठी कार्यरत राहील याबद्दल त्यांनी भाष्य केले. या संघटनेद्वारे १४४० एमफिलधारक प्राध्यापकांचा प्रश्न चर्चेद्वारे सोडविल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठ कॅम्पस कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ निखिल गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ प्रतिभा देसाई, महामंत्री: डॉ पी डी पाटील, कोषाध्यक्षपदी डॉ सुभाष कोंबडे यांची निवड झाली. कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी अध्यक्षपदी डॉ.शरद बनसोडे, उपाध्यक्षपदी डॉ. आरती नाडगोंडा, महामंत्रीपदी डॉ.धनंजय पाटील, कोषाध्यक्ष म्हणून डॉ सूर्यकांत पंडित यांच्यावर जबाबदारी सोपविली. सांगली जिल्हा कार्यकारणी अध्यक्षपदी डॉ शोभा मधाळे, महामंत्रीपदी डॉ शिवराम खडके, कोषाध्यक्षपदी डॉ. राजगुरू आहेत. सातारा जिल्हा कार्यकारणी अध्यक्षपदाची धुरा प्रा.अभय जायभाये यांच्याकडे सोपविली. या बैठकीसाठी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी सुद्धा उपस्थिती नोंदवली आणि एबीआरएसएम ची स्थापना शिवाजी विद्यापीठात झाली याबद्दल समाधान व्यक्त केले.