दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला-डॉ. राजन गवस
schedule14 Sep 25 person by visibility 11 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला. महाष्ट्राच्या बदललेल्या वाचनसंस्कृतीचे चित्र दलित साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाले आहे. ’ असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती सन्मान विजेते ज्येष्ठ लेखक प्रा. शरणकुमार लिंबाळे यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कुलसचिव डॉ. विलास शिंदे से अध्यक्षस्थानी होते.
डॉ. गवस म्हणाले, दलित साहित्य ही भारतीय साहित्याला लाभलेली देणगी आहे. आंबेडकरी विचारविश्वाचा आविष्कार आणि वर्तमानाची उलटतपासणी लिंबाळे यांच्या साहित्यात आली आहे. त्यामुळे लिंबाळे हे भारतीय स्तरावर पोहोचले.’ साहित्यिक प्रा. शरणकुमार लिंबाळे म्हणाले, आपल्या भोवतालचे वातावरण अस्वस्थ करणारे आहे. आपल्या भाषेवर सांस्कृतिक साम्राज्यवाद आक्रमण करतो आहे. अशा काळात साहित्य हे सांस्कृतिक संवाद निर्माण करणारे असते. लेखकाने सामाजिक भान ठेवून तसेच निर्भय होऊन लिहायला हवे.
कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आज माणसांच्या संवेदना संपत चाललेल्या आहेत. व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमे आपल्यासमोर आहेत. अशावेळी समाजाकडे डोळसपणे पाहून साहित्याने समाजाचे मूलभूत प्रश्न मांडले पाहिजेत. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. दीपक भादले, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. श्यामसुंदर मिरजकर उपस्थित होते.