बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी मोफत जेवण ! शेतमालासाठी कोल्डस्टोरेज, व्यापाऱ्यांसाठी दुकाने गाळे !!
schedule14 Sep 25 person by visibility 138 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवण आणि निवास व्यवस्था सुरू केली आहे. अशी घोषणा सभापती सुर्यकांत पाटील यांनी केली. २०२५ मध्ये बाजार समितीचे उत्पन्न २५ कोटीवर नेऊन स्टार बाजार समिती बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (१४ सप्टेंबर २०२५) झाली. या सभेत सभापती पाटील यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध घोषणा केल्या. बाजार समितीचे कार्यक्षेत्र साडेसहा तालुक्याचे आहे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्ह्णून मोफत जेवण व निवास सुविधा १४ सप्टेंबरपासून अंमलात आणली आहे. यासाठी कूपन पद्धत असणार आहे. असे त्यांनी सांगितले. बाजार समितीचे कामकाज संगणकीकृत केले जाईल. पारदर्शक कारभारावर आपला भर आहे. बाजार समितीचा पै-पैचा हिशेब ठेवला जाईल.
बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या शेतमाल साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज उभारणी प्रस्तावित आहेत. तसेच शतीमाल खरेदी विक्री व्यवसायासाठी २५ दुकानगाळे उभारण्यात येणार आहेत. हे दुकानगाळे भाडेतत्वावर दिले जातील. बाजार समितीच्या आवारातील प्लॉटधारकांना खरेदी/लिज् प्रॉपर्टीधारकांना प्रापर्टीकार्ड देण्याचे काम महिनाभरात होईल असेही त्यांनी सांगितले. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी यांनी केले. उपसभापती राजाराम चव्हाण यांनी आभार मानले. सभेला संचालक प्रकाश देसाई, शेखर देसाई, बाळासाहेब पाटील, पैलवान संभाजी पाटील, मेघा देसाई, शंकर पाटील, संदीप वरंडेकर, सुयोग वाडकर, शिवाजीराव पाटील, सोनाली शरद पाटील, नानासो कांबळे, पांडूरंग काशीद, नंदकुमार वळंजू, कुमार आहुजा, दिलीप पोवार आदी उपस्थित होते.
…………..
व्यापाऱ्यांची कुंडली माझ्याकडे, उलाढाली माहिती तेव्हा..
वार्षिक सभेत बोलताना सभापती पाटील यांनी, शेतकऱ्यांचे हित पाहताना व्यापारी वर्गालाही अधिकाधिक सुविधा देऊ. फळे व भाजीपाला मार्केट युनिट नंबर एक व दोनमधील सिमेंट पत्रे बदलण्यात येतील. अशी ग्वाही दिली. त्याचवेळी त्यांनी, ‘बाजार समितीच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी-व्यावसायिकांनी सहकार्य करावे. सगळया व्यापाऱ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. कोणाची किती उलाढाल आहे हे सगळे माहिती आहे. त्यामुळे सेस व्यवस्थित भरा’अशा कानपिचक्या त्यांनी दिले. बाजार समितीचे वेबसाइट तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.