भैया मानेंच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर, मेळाव्यात विक्रमी मतदार नोंदणीचा संकल्प !
schedule01 Aug 25 person by visibility 142 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक भैया माने यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी विक्रम मतदार नोंदणीचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने केला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सभासद नोंदणी व पदवीधर मतदार नोंदणी अभियान या अनुषंगाने मेळाव्याचे आयोजन केले होते. शुक्रवारी सायंकाळी आयोजित या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने हे विविध माध्यमातून लोकांशी निगडीत आहेत. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार अशा विविध क्षेत्रात मोठा संपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून ते पक्षासाठी धडाडीने काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी एकदा पदवीधरमधून नेत्यांच्या विनंतील मान देऊन माघार घेतली. आता मात्र पुणे पदवीधर मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळेल इतके विक्रमी पदवीधर मतदार नोंदणी करा. मतदार नोंदणीसाठी मोहीम राबवा.’
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले,‘भैया माने यांना आमदार करण्यासाठी गावागावात जाऊन पदवीधर मतदार नोंदणी करू या. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम आहे. पदवीधरची उमेदवारी त्यांना मंत्री मुश्रीफ मिळवून देतील हा विश्वास आहे. यासाठी आपण मोठया संख्येने मतदार नोंदणी करु. मध्यवर्ती बँकेसह गोकुळमध्येही मंत्री मुश्रीफ हे नेतृतव करतात. सगळी यंत्रणा मतदार नोंदणीसाठी उपलब्ध करा.’
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘भैया माने यांना पदवीधरची उमेदवारी व त्यांना निवडणुकीत विजयी केल्याशिवाय मंत्री मुश्रीफ हे स्वस्थ बसणार नाहीत.आजरा, चंदगड, गडहिंग्लजमधून विक्रमी मतदार नोंदणी करू.’ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी, कोल्हापुरातून राष्ट्रवादीची सभासद नोंदणी व पदवीधर मतदार नोंदणी राज्यात उच्चांकी ठरेल इतकी करू. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सभासद व पदवीधर मतदार नोंदणीची स्पर्धा ठेवू. जे सर्वाधिक करतील त्या मतदारसंघाला जास्त निधी मिळावा.’असे नमूद केले. कागलमध्ये सगळं काही आहे, यामुळे पुन्हा कागलला निधी नको अशी टिप्पणीही त्यांनी केली.भैया माने पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया सांगितली. एक ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे. पक्षाचा मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. सगळया जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.’असेही ते म्हणाले. शहराध्यक्ष आदिल फरास यांनी, कोल्हापूर शहरातून सर्वाधिक मतदार नोंदवू असा शब्द दिला. गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले यांनी भैया माने हे तडफदार व कार्यक्षम नेतृत्व आहे. सर्वसामान्यांत मिसळणारा हा कार्यकर्ता आमदार होण्यासाठी ताकतीने मतदार नोंदणी करू.’ कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी, प्रत्येक तालुक्यातून सभासद नोंदणी आवश्यक असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी महेंद चव्हाण, रामेश्वर पतकी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रींफ, संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे सभापती सुर्यकांत पाटील, उपसभापती राजाराम चव्हाण, महिला आघाडीच्या शीतल फराकटे, बिद्रीचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, सूतगिरणीचे चेअरमन उमेश भोईटे, पंडितराव केणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील, केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई, माजी नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे, परिक्षीत पन्हाळकर, संभाजी देवणे, प्रकाश गवंडी, सतीश लोळगे, प्रकाश गाडेकर, आप्पासाहेब धनवडे, वसंतराव धुरे, विलास आयरे, सुहास साळोखे, अमित गाताडे, सुनील गाताडे,सुहास जांभळे, निहाल कलावंत, जहिदा मुजावर आदींची प्रमुख उपस्थिती होती.