सुनीलकुमार लवटेंचा शुक्रवारी अमृतमहोत्सवी सत्कार, गिरीश कुबेरांचे व्याख्यान
schedule07 Apr 25 person by visibility 150 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यक, समीक्षक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे हे येत्या ११ एप्रिलला वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गाैरव करण्यासाठी येत्या शुक्रवारी डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. जी. पी. माळी, सचिव डॉ. विश्वास सुतार, प्रा. सी. एम. गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राम गणेश गडकरी हॉलमध्ये सायंकाळी ४:३० वाजता ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी असतील. यावेळी गिरीश कुबेर यांचे महाराष्ट्राची प्रबाेधन परंपरा : इतिहास, वर्तमान आणि भविष्य या विषयावर व्याख्यान होईल. अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने ११ एप्रिल २०२४ पासून आजतागायत वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात आले.
विचारवंत, साहित्यिकांची व्याख्याने, शिक्षकांसाठी कार्यशाळा, इतिहास परिषद घेण्यात आली. दरम्यान, अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमावेळी विविध उपक्रमांतर्गत झालेल्या व्याख्यानांतील भाषणाचा संग्रह असलेल्या अमृतमंथन या ग्रंथाचा, तसेच डॉ. विश्वास सुतार यांच्या पीएच.डीचा प्रबंध असलेल्या डॉ. सुनीलकुमार लवटे समग्र वाङमय या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. अमृतमंथन हा ग्रंथ उपस्थित ५०० जणांना मोफत देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जॉर्ज क्रूझ, दीपक जगदाळे, संजय कळके, डॉ. रघुनाथ कडकणे यांनी केले.