शिरोळची पाटीलकी यड्रावकरांच्याकडेच, राजेंद्र पाटील ४० हजार मताधिक्यांनी विजयी
schedule24 Nov 24 person by visibility 60 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिरोळ विधानसभा मतदारसंघातील लढत तीन प्रमुख पाटील उमेदवारांत होती. दरम्यान या लढतात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाजी मारली. त्यांना एक लाख ३४ हजार ६३० मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांना ९३ हजार ८१४ मते तर माजी आमदार उल्हास पाटील यांना २५ हजार दहा मते मिळाली. या निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर हे ४० हजार ८१६ मतांनी विजयी झाले. तर उल्हास पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का आहे.
शिरोळ मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. महायुतीकडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसकडून गणपतराव पाटील आणि तिसऱ्या आघाडीतंर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उल्हास पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. या मतदारसंघात ७८.०८ टक्के मतदान झाले. यामध्ये दोन लाख ५६ हजार ९९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या झाल्या.
यड्रावकर यांनी प्रचार कालावधीत मतदारसंघातील विकासकामावर फोकस ठेवला होता. काँग्रेसचे गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम, क्षारपडमुक्त जमीन प्रयोग, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना यावर भर दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली होती. यावरुन स्वाभिमानीत ठिणगी पडली. सावकार मादनाईक व इतरांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता.