न्यू कॉलेजमध्ये साकारला आधुनिक ई कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओ
schedule25 Dec 24 person by visibility 97 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० मधील ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यास चालना देण्यासाठी न्यू कॉलेजमध्ये आधुनिक सोयी सुविधासह ई कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओ साकारला आहे. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत पारंपरिक महाविद्यालयामध्ये अशा स्वरूपाच्या स्टुडिओ ची उभारणी पहिल्यांदाच केली आहे.
या स्टुडिओचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांचे हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी या स्टुडिओचा वापर जास्तीत जास्त प्राध्यापकांनी करून दर्जेदार ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून द्यावे असे आवाहन केले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. त्यांनी या स्टुडिओमधून तयार होणारे ई कंटेंट, मुक्त विद्यापीठाच्या नोकरी करत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल असे सांगितले.
संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी भविष्यात अशा प्रकारचे स्टुडिओ ही डिजिटल ज्ञानमंदिरे असतील आणि याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यासाठी वापर व्हावा असा आशावाद व्यक्त केला. या स्टुडिओसाठी आवश्यक निधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र, न्यू कॉलेज, यांच्या निधीमधून उपलब्ध करून दिला. या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, प्राचार्य डॉ. व्ही. एम पाटील, संस्थेचे आजीव सेवक उदय पाटील,शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ टी. एम. चौगले, उपप्राचार्य डॉ. आर. डी. धमकले, प्रबंधक एम. वाय. कांबळे, समन्वयक डॉ. एन. व्ही.पवार उपस्थित होते.