सातारा - कागल महामार्गाचे काम संथगतीने, कंत्राटदाराला नोटीस
schedule26 May 25 person by visibility 98 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सातारा - कागल महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे या मार्गावरील प्रवासास खूप वेळ लागत आहे. या महामार्गाच्या कामाला विलंब केल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई करा अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
सातारा - कागल महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. सातारा - कागल हायवे रोडवरील उड्डाणपूल, सातारा -कागल महामार्गाचे काम, या महामार्गादरम्यान सांगली फाटा ते उचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाचा डीपीआर, तसेच तावडे हॉटेल ते सीपीआर चौक ते गगनबावडा रोड/ रत्नागिरी रोड तसेच कोल्हापूर इंटरनल सिटी इलेव्हेटेड फ्लाय ओव्हरचे सादरीकरण आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंता पी. एस. महाजन, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व उड्डाणपुलांशी संबंधित डीपीआरचे सादरीकरण संजय कदम यांनी केले. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गांचे काम जलद गतीने पूर्ण करा. उड्डाणपूलांचे डीपीआर अंतिम करुन लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करा.
सातारा - कागल हायवे एनएच रोडवर कागल शहरासाठी उड्डाणपूल होण्याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी सूचना केली. त्यानुसार आराखडा तयार केला आहे. सातारा - कागल महामार्गादरम्यान सांगली फाटा ते उंचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या डीपीआरचे तसेच शहराच्या प्रवेश मार्गावर पंचगंगा पुलानजीकच्या प्रस्तावित बास्केट ब्रिजचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले. शिवाजी पूल ते केर्ली दरम्यानचा रस्ता पुरामुळे पाण्याखाली जातो. या मार्गावर पाण्याचा निचरा होणाऱ्या उपाययोजना करून नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या आराखड्याचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.