गोकुळमार्फत उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा, दूध उत्पादकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा –अरुण डोंगळे
schedule26 May 25 person by visibility 112 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फ जातिवंत मादी वासरू संगोपन योजना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या गोठ्यावर राबविली जात असून या योजनेत नोंद झालेल्या रेड्या-पाड्यांचे चांगले संगोपन होऊन त्या वेळेत दुधात याव्यात यासाठी दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाच्या निमित्याने एक जून रोजी संघाच्या वासरू संगोपन योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या वासरांच्या स्पर्धा आयोजित केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात संघाच्या विभागीय पशुवैद्यकीय केंद्राकडे वासरू संगोपन योजनेतील जास्त नोंदणी झालेल्या कार्यक्षेत्रातील ३५ गावात एक जून २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वाजता या वेळेत होणार आहे. त्यानंतर अशी स्पर्धा प्रत्येक महिन्याला कार्यक्षेत्रातील उर्वरित गावात घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वासरांच्या कानात योजनेचा टॅग असणे बंधनकारक आहे. स्पर्धा गावातील सर्व संस्थेसाठी खुली आहे. गावातील सार्वजनिक व सोयीच्या ठिकाणी घेतली जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रेड्या - पाड्याना संघामार्फत जंतनिर्मुलनाचे औषध मोफत देण्यात येणार आहे. संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा रेडी व पाडीसाठी ० ते ६ महिने व ६.०१ ते १२ महिने अशा दोन वयोगटात होणार असून विजेत्यांना बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन ‘उत्कृष्ट वासरू संगोपन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे