+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustवस्ताद बाबूराव चव्हाण यांचे निधन adjustकागल-पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी-धैर्यशील माने adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार
1000926502
1000854315
schedule12 Aug 24 person by visibility 318 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणीचा विषय पोरखेळ नसून गांभीर्याने घेण्याचा आहे. राज्य सरकार त्याला मोठा निधी देईल पण त्याचबरोबर लोकवर्गणीचा हातभार लागला तरीही वावगे ठरणार नाही अशी भूमिका खासदार शाहू छत्रपती यांनी मांडली.
नाट्यगृहाची उभारणी पूर्वीप्रमाणेच उभारले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देत खासदार शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली समितीला सरकारची मान्यता असेल. ही समिती नाट्यगृहाची उभारणी काळजीपूर्वक व लक्षपूर्वक करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खासदार शाहू छत्रपती यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीबाबत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींसह रंगकर्मी, आर्किटेक्ट, इंजिनियर, उद्योजक ,व्यापारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी नाट्यगृह उभारणी बाबत सूचना केल्या. एक वर्षाच्या आत नाट्यगृहाची उभारणी करावी, अशी मागणी झाली. सकिर्ट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात  बैठक झाली. 
 अभिनेता आनंद काळे, उद्र्ंयोजक सुरेंद्र जैन, नाट्य दिग्दर्शक किरण चव्हाण, प्रसाद जमदग्नी, नाट्यकर्मी सुनील घोरपडे, हर्षल सुर्वे, आर्किटेक्ट मोहन वायचळ, डॉ. रमेश जाधव, गिरीश फाेंडे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, इतिहास अभ्यासक राम यादव ,प्राचार्य महादेव नरके, आर्किटेक्ट आणि इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराने, आर्किटेक्ट इंद्रजीत नागेशकर, कॉम्रेड सतीश कांबळे, विजय कोराणे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई पंडित कंदले यांनी नाट्यगृह पूर्वीप्रमाणे उभारले पाहिजे अशी आग्रही मागणी केली.  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार यांनी नाट्यगृह उभारणीचे टेंडर प्रसिद्ध व्हावे पण त्यामध्ये तोड पाण्याची सूचना होता कामा नये अशी मागणी केली. 
 खासदार धनंजय महाडिक यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्श झालेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे बांधकाम आहे त्या स्थितीत झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी नाट्यगृह उभारण्यासाठी पाच कोटी रुपये जाहीर केले असून हा निधी खर्च करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना केली. नाट्यगृहातील दुर्घटनेतील दोषीवर कारवाई करावी अशी मागणी जयश्री जाधव यांनी करत नाट्यगृह मूळ स्वरूपात लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली. तसेच केशवराव भोसले यांचा पुतळा ही नाट्यगृहाच्या परिसरात उभा करावा अशी सूचना ही त्यांनी केली. शाहू छत्रपती यांची वन मॅन कमिटी स्थापन करावी अशी मागणी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केली. या कमिटीत तज्ञांना निमंत्रित करावे अशी सूचना ही केली. 
  शाहू छत्रपती म्हणाले, नाट्यगृह उभारणी बाबत भिन्न भिन्न विचार असले तरीही नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच उभारावे, अशी मागणी एकमताने झाली आहे .पण त्याचबरोबर नाट्यगृह उभारणी करताना डिझास्टर मॅनेजमेंटकडे लक्ष देण्याची गरज आहे. माझ्या नेतृत्वाखाली जरी समिती नेमली तरी आम्हाला वॉच डॉग प्रमाणे भूमिका घ्यावी लागेल. नाट्यगृह उभारणीसाठी नाट्यकर्मी ,आर्किटेक्ट ,इतिहास संशोधक यांची मदत होणारच आहे. पण त्याचबरोबर सरकारच्या  निधी बरोबर लोकवर्गणीही स्वीकारण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा हा लोकवर्गणीतून झाला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महानगरपालिकेने नाट्यगृह उभारणीसाठी २५ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सरकारने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पाच कोटी रुपये हे विम्यातून उपलब्ध होणार आहेत. हे काम लवकर व्हावे अशी इच्छा माझ्यासह सर्वांची आहे. पण आचारसंहितेचा अडथळा असल्याने त्यातून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढावे लागेल महानगरपालिकेने सात दिवसात टेंडर काढले आणि त्याला नगरविकास खात्याची परवानगी मिळाली तर काम लवकर सुरू होईल. राजश्री शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या समितीला सरकारी मान्यता दिली जाईल. ही समिती नाट्यगृहाच्या उभारणीबाबत लक्षपूर्वक काम करेल. नाट्यगृह उभारणीसाठी निधी कमी पडणार नाही. तसेच पूर्वीप्रमाणे जशेच्या तसे नाट्यगृहाची उभारणी होईल ,अशी ग्वाही त्यांनी दिली. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले. 
...........
मुश्रीफ साहेब मी तुमच्या अंगावर येणार- संभाजीराजे. 
बैठकीमध्ये खासदार संभाजी राजे यांनी अभ्यासपूर्ण सूचना केल्या. रायगड उभारणीबाबत आलेले अनुभव त्यांनी कथन केले. राज्य सरकार किती निधी देईल हे पाहिले जाईल. नाट्यगृहाची उभारणी करताना काही चूक झाली तर मी खासदार शाहू छत्रपती यांना विचारू शकत नाही .पण या कामात दोन ते पाच टक्के कमिशन चालणार नाही. असे झाले तर मी तुमच्या अंगावर येणार असा इशाराही त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना दिला.