हलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचना
schedule15 Nov 25 person by visibility 46 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणाचे व खासबाग मैदान दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा अशा सक्त सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्य समवेत नाट्यगृह आणि खासबाग मैदानाची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, विजयसिंह खाडे पाटील, अविनाश कुंभार उपस्थित होते. यावेळी आमदार महाडिक यांनी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदान हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. ठरलेल्या मुदतीत दर्जेदार काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. तर झालेल्या कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांची आहे. दोघांनीही जबाबदारीत कुचराई करू नये असे आमदारांनी निक्षून सांगितले. नाट्यगृहाचा ऐतिहासिक बाज जपत अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, असून व्यवस्था आणि इतर सुविधा निर्माण केल्या जातील अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी उपस्थित रंगकर्मींना दिली. रंगकर्मी आणि नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेऊन काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यानंतर आमदार महाडिक यांनी खासबाग मैदानाची पाहणी केली. मैदानाची स्वच्छता नियमित राखली जाणे गरजेचे आहे. त्यासाठी महानगरपालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. खासबाग मैदानाच्या तटबंदीवर वाढलेली झाडे काढून टाकावीत. मैदानाच्या कठड्यालगत असलेल्या अशोकाच्या झाडांना इतरत्र पुनर्रोपित करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. त्याचबरोबर संपूर्ण बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक तेथे डागडुजी करून घ्यावी असेही ते म्हणाले. यावेळी पैलवान माऊली जमदाडे यांच्यासह अन्य मल्लांनी खासबाग मैदानात पहाटेच्या वेळी कुस्तीचा सराव करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली. त्याचबरोबर मैदानामध्ये लाईट आणि चेंजिंग रूमची व्यवस्था करण्याची मागणी ही त्यांनी केली. याबाबत प्रशासकीय स्तरावर निर्णय घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना आमदार महाडिक यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना दिल्या. आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन केंद्र आणि राज्य शासनाकडून हेरिटेज वास्तू देखभालीसाठी विशेष प्रस्ताव सादर करून निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.
यावेळी पैलवान बाबाराजे महाडिक, विकी महाडिक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, रंगकर्मी प्रसाद जगदग्नी, सुनील घोरपडे उपस्थित होते.