टेक-मेक-डिस्पोजल आणि पुन्हा मेक या पद्धतीने काम केले तरच प्रदूषणाला आळा – सिद्धेश कदम
schedule02 May 25 person by visibility 170 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आजची युवा पिढी पर्यावरणासंदर्भातील समस्यांची जाणीव ठेवून नवकल्पनांद्वारे प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी कचऱ्याचे पुर्नवापरायोग्य रूपांतरण करून नव्या वस्तू तयार करण्यावर भर दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर होऊ शकतो. त्यामुळे केवळ खरेदी करा वापरा आणि टाका इतकाच मर्यादित विचार न करता यापुढे कचऱ्यात टाकलेल्या वस्तूचा देखील पुनर्वापर करा. 'टेक, मेक, डिस्पोजल आणि पुन्हा मेक' अशा पद्धतीने काम केले तरच प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसू शकेल. वाढत्या’असे मत मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग आणि डी. वाय पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी' या विषयावरील एक दिवसीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हॉटेल सयाजी येथे परिषद झाली. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये परिषद आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली. वडाच्या रोपाला पाणी घालून पर्यावरणीय परिषदेचे उद्घाटन झाले.
माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात २१ साखर कारखाने आहेत. हजारो लहान मोठे उद्योग आहेत. इचलकरंजीसारखी कपड्याची बाजारपेठ आहे आणि हा जिल्हा पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्याच्या ९० टक्के रिसायकलिंग होत आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध घटक काम करत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहकार्य केल्यास भविष्यात कोल्हापूर जिल्हा १०० टक्के प्रदूषण मुक्त जिल्हा म्हणून राज्यात नावलौकिक मिळवेल.’
दिवसभरातील चर्चासत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सल्लागार नंदकुमार गुरव, टेक्नो वेस्ट मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण कापसे,वातावरणीय बदल विभागाचे संचालक अभिजीत घोरपडे, डी. वाय. पाटील अभिवादन विद्यापीठाच्या आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, 'टेक्नोग्रीन सोल्युशन्स'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय ओझा यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जयवंत हजारे, सहसंचालक रवींद्र आंधळे, सांगलीचे उपविभागीय अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, कोल्हापूरचे उपविभागीय अधिकारी पी.आर. माने, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे ए खोत, डॉ. अजित पाटील, उदय गायकवाड आदी उपस्थित होते. सुरेश भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आभार मानले.