रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत निलेश देसाईंचा भाजपात प्रवेश
schedule05 Aug 25 person by visibility 175 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी मंगळवारी (पाच ऑगस्ट २०२५) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला. प्रा. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष चव्हाण व मंत्री पाटील यांनी, देसाई यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपा प्रवेशानंतर बोलताना माजी नगरसेवक निलेश देसाई म्हणाले, ‘मी, तीन वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. पत्नी, पल्लवी देसाई या एकदा निवडून आल्या होत्या. प्रभागातील विविध विकासकामांना चालना देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. भाजपकडून विविध विकासकामांची खात्री दिली आहे, विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्याद्वारे लोकांची कामे होतात. म्हणून भाजपात प्रवेश केला आहे.’ दरम्यान देसाई यांनी ताराबाई पार्क प्रभागातून महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. ते, शिक्षण समितीचे सभापती होते.