विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जवानांसाठी दोन लाख दहा हजार राख्यांचे संकलन
schedule07 Aug 25 person by visibility 102 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर - ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा उपक्रम गेली २६ वर्षे चालू आहे. या उपक्रमातून सैनिकांचे मनोधैर्य वाढण्यास साहाय्य होते, असे गौरवोद्गार निवृत्त सुभेदार एम्.एन्. पाटील यांनी काढले.
या उपक्रमाचे राजर्षी शाहू स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरासह इचलकरंजी राधानगरी कागल भुदरगड गारगोटी टिटवे येथील ५० पेक्षा अधिक शाळा आणि महिला बचत गट या उपक्रमात सहभागी झाले. ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे म्हणाले, ‘‘कारगील युद्धापासून झालेला हा उपक्रम सीमेवरील जवानांसाठी राख्या पोचवण्यासाठी ट्रस्ट एक माध्यम आहे. मुलांप्रमाणे युवतींचीही लष्करात जाण्यासाठी संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी कोल्हापूर शहरात ‘ताराराणीच्या नावाने लष्करी महाविद्यालय चालू व्हायला हवे.’’ या प्रसंगी शहीद महाविद्यालयाच्या अध्यक्षा वीरमाता लक्ष्मीबाई पाटील, सुभेदार संजय पाटील, माजी लष्कर अधिकारी चंद्राहार पाटील, ट्रस्ट’चे सचिव राजेंद्र मकोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी यशश्री घाटगे, सुनिता मेंगाणे, योगिता सोडलीकर, डॉ. सायली कचरे, माजी नगरसेविका माधुरी किरण नकाते, धनंजय नामजोशी, कमलाकर किलकिले, महेश कामत, प्रशांत बरगे ,अशोक लोहार , माजी सैनिक विरेंद्र हारूगले , राजेंद्र भंडारे , बी डी पाटील संभाजी माने, शिवानंद स्वामी उपस्थित होते. ‘न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी बियांपासून केलेली १० फूट राखी सुपूर्द केली. या कार्यक्रमात छत्रपती शाहू विद्यालय, कर्मवीर इंग्लीश स्कूल यांसह शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने देशभक्तीचा अविष्कार झाला. देशप्रेम वृद्धींगत करणार्या या ‘शिवाई ग्रुप’च्या लहान मुलांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. शिवगंधार समूहाच्या वैदही जाधव नरेंद्र पाटील स्वप्नील पन्हाळकर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.