कोट्यवधीच्या जाजम-घडयाळ खरेदीवरुन ठाकरे गटाकडून प्रश्नांची सरबत्ती, गोकुळचे एमडी म्हणाले कामकाज नियमानुसार, बोर्ड मिटिंगच्या मान्यतेने !
schedule06 Aug 25 person by visibility 145 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोट्यवधी रुपयांची जाजम व घडयाळ खरेदी, संचालकांचा गोवा दौरा यावरुन शिवसेना ठाकरे पक्षातर्फे गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तीन कोटी ७४ लाख रुपये किंमतीचे जाजम व घड्याळ खरेदी निविदा प्रक्रिया न राबविता कोटेशन पद्धतीने कशाच्या आधारे केली ? संचालकांच्या गोवा दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या हिताचे काय निर्णय झाले ? मेडिटेशन करण्यासाठी गोव्याला जायची गरज आहे का ? संचालक कुटुंबासहित दौऱ्यावर गेले होते हे खरे आहे का ? असा सवाल केला. यावर गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोल यांनी, ‘गोकुळचे कामकाज, जाजम व घडयाळ खरेदी ही नियमानुसार झाली आहे. संचालक मंडळाची मान्यता घेऊनच खरेदी प्रक्रिया राबविली आहे. गोवा दौरा हा संचालकांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास, दुग्ध व्यवसायातील बदलते धोरण व प्रशिक्षण या अनुषंगाने आयोजित केले होते असे सष्ट केले.
गोकुळ दूध संघाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ६५०० हून अधिक प्राथमिक दूध संस्थांना तीन कोटी ७४ लाख रुपये किंमतीचे जाजम व घडयाळ या वस्तू भेट स्वरुपात दिल्या आहेत. दरम्यान ही खरेदी प्रक्रिया सहकार कायदा व नियमावलींना बगल देऊन झाल्याचा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, नवेज मुल्ला, विराज पाटील, तानाजी आंग्रे, अवधूत साळोखे, स्मिता मांडरे आदींच्या शिष्टमंडळाने गोकुळचे कार्यकारी संचालक गोडबोले यांची भेट घेऊन निवेदन दिले. संचालक बयाजी शेळके यांची उपस्थिती होती. पवार म्हणाले, ‘सहकार कायद्यानुसार संस्थेमध्ये खरेदी करताना जाहीर निविदा देऊन खरेदी करावी लागते. मात्र जाजम व घडयाळ खरेदी करताना निविदा प्रक्रिया का राबविली नाही ? कोटेशन पद्धतीचा अवलंब कोणाच्या सांगण्यावरुन केला ? ही खरेदी बेकायदेशी आहेत. ही प्रक्रिया राबविणाऱ्यांकडून पैसे वसूल करा.’ विजय देवणे यांनी खरेदी प्रक्रियेदरम्यान नियमावलींना फाटा दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. सहकार कायदा पाळला जात नाही असे आक्षेप नोंदविले. पशुखाद्यातही घोटाळा झाला आहे याप्रकरणी संबंधितावर फौजदारी का केली नाही ? गोकुळमधील गैरप्रकारप्रकरणी कलम ८८ प्रमाणे चौकशीची मागणी का करू नये असा सवाल पवार यांनी केला.
………………………
जाजम-घड्याळ खरेदी नियमानुसारच
गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी प्रत्येक प्रश्नाचे निरसन केले. ते म्हणाले, ‘जाजम व घडयाळ खरेदी नियमानुसार झाली आहे. कोटेशन पद्धतीचा अवलंब करताना तीन कोटेशन प्राप्त झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये सर्वात कमी दराच्या कोटेशनला प्राधान्य दिले. जाजम व घड्याळ खरेदीसाठी संचालक मंडळाची मान्यता घेतली आहे. यापूर्वी सुद्धा कोटेशन पद्धतीचा अवलंब केला आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच कामकाज सुरू आहे. गोवा येथे संचालकांसाठी आयोजित दौरा हा दुग्ध व्यवसायासंबंधी प्रशिक्षणाचा भाग होता. दुग्ध व्यवसायाच्या अनुषंगाने असे अभ्यास दौरे उपयुक्त ठरत असतात. या दौऱ्यात फक्त संचालकांचा खर्च गोकुळने केला आहे. जाजम व घडयाळ खरेदीच्या प्रक्रियेसंबंधी ज्या शंका आहेत त्यासंबंधी ऑडिटरचा सल्ला घेऊन निरसन करू. पुढील आठवडयात बोर्ड मिटींग आहे. त्या मिटिंगनंतर सगळया प्रश्नांची उत्तरे दिली जातील.’