नॉलेज इज पॉवर ! तीन विद्यापीठांचे कुलपती !!
schedule16 Feb 25 person by visibility 2203 categoryशैक्षणिक

डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी समारंभ १८ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित लेखमालिका…भाग एक
आप्पासाहेब माळी , महाराष्ट्र न्यूज वन : योग्य नियोजन, कल्पकता, नाविन्याचा ध्यास, सतत कार्यमग्न, आणि जे करायचं ते उत्कृष्ट ही पंचसुत्री एकवटली तर अलौकिक कामगिरी घडते. माणूस सर्वार्थांनी मोठा होतो, याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे, डॉ. संजय डी. पाटील. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष. मात्र त्यांची ओळख इतक्यापुरतीच मर्यादित नाही. ते तीन विद्यापीठाचे कुलपती आहेत. साठहून अधिक संस्थांचे अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच कृषी, बांधकाम, हॉटेल, रिटेल, सहकार अशा विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. ते कुलपती असलेल्या तीन विद्यापीठात पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी विविध शाखेत उच्च शिक्षण घेत आहेत. डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपचे ’नॉलेज इज पॉवर’ या ब्रीदवाक्याची प्रचिती संस्थेच्या कार्यविस्तार आणि डॉ. संजय डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्वातून अनुभवयास येते.
डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे आणि डीवाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी या तीन विद्यापीठांचे ते कुलपती आहेत. या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, कृषी, आरोग्य सेवा, ग्रामीण विकास या क्षेत्रात अलौकिक अशी कामगिरी केली आहे. मुळात ते, सिव्हील इंजिनीअर. मात्र त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकले, त्या त्या क्षेत्रात अमीट अशी मुद्रा उमटविली.
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये डीवाय पाटील शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे, संजय पाटील यांच्याकडे या शैक्षणिक संस्थेची जबाबदारी आली. आज या संस्थेचा विस्तार देशभर पसरला आहे. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून इंजिनींअरिंग, मेडिकल, फार्मसी, नर्सिंग, कृषी अशा विविध ज्ञानशाखा सुरू केल्या. कोल्हापूर, तळसंदे आणि आकुर्डी पुणे येथील विद्यापीठांचा कॅम्पस पाहिला की डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे ते खऱ्या अर्थाने शिल्पकार असल्याचे अधोरेखित होते. संस्थेतील विद्यार्थी हा ज्ञानांनी परिपूर्ण असावा, हा त्यांचा दृष्टिकोन आहे. यासाठी त्यांनी उच्चतम दर्जाच्या पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचे अध्यापन-संशोधन याबाबीवर फोकस ठेवला. तळसंदे येथील ओसाड माळरानावर त्यांनी कृषी व तंत्र विद्यापीठ स्थापन केले. शेकडो एकरचा हा परिसर. शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करत हा सारा हिरवागार केला. आधुनिक शेतीचे कृतीशील विद्यापीठ त्यांनी येथे साकारले. कोल्हापुरात मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा वास्तुपाठ घालून दिला. तर सयाजी हॉटेल व डीवायपी मॉलची उभारणी करुन कोल्हापूरच्या वैभवात भर घातली.
……………..
हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
आई शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. संजय डी. पाटील यांनी हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. संस्थेच्या विविध शाखेतील अभ्यासक्रमात सर्वाधिक गुणांना उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशीप’ या नावांनी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना झाला. कोटयवधी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. पाटील यांचा हा आदर्शवत उपक्रम त्यांच्या व्यक्तिमत्वातील वेगळया पैलूचे दर्शन घडवितो.