बेंगलोर, हैदराबादसाठी विमानसेवा ! कोल्हापूर विमानतळाच्या हवाई सेवेचे विस्तारीकरण !!
schedule29 Apr 25 person by visibility 89 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्टार एअरवेजकडून कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या स्टार एअरवेज कडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जातेे. त्यामध्ये आता बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांची भर पडली आहे. त्यामुळे बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी आता कोल्हापुरातून इंडिगो आणि स्टार एअरवेज या दोन कंपन्या हवाई सेवा देणार आहेत. पंधरा में 2025 पासून या विमानसेवाला सुरुवात होईल.
खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे स्टार एअरवेजने कोल्हापूर - हैदराबाद - कोल्हापूर ही विमानसेवा दर मंगळवारी आणि बुधवारी सुरू करण्याचे घोषित केले आहे. सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी स्टारचे विमान हैदराबाद वरून उड्डाण करेल आणि दहा वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात येईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेले स्टार एअरवेजचे विमान, ४ वाजून ५ मिनिटांनी हैदराबाद मध्ये पोहोचेल. तर प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर - बेंगलोर- कोल्हापूर या मार्गावर, स्टार एअरवेजचे विमान प्रवाशांना सेवा देईल. कोल्हापुरातून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि १२ वाजून ३५ मिनिटांनी विमान बेंगलोर मध्ये उतरेल. तर बेंगलोर मधून दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल आणि २ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल. स्टार एअरवेजच्या या नव्या प्रवासी सेवेमुळे उद्योग क्षेत्रातील विशेषतः आयटी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची मोठी सोय होईल. राज्यातील आणि देशातील प्रमुख शहरांशी कोल्हापूर हवाई मार्गे जोडले जावे, यासाठी खासदार महाडिक सातत्याने प्रयत्नशील आहेत.