शिक्षण संचालकांसोबतची चर्चा फिस्कटली ! शिक्षकांचा निपुण ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम !!
schedule07 Apr 25 person by visibility 4537 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निपुण महाराष्ट्र उपक्रम हा ऑनलाइन नको, ऑफलाइन पद्धतीने राबवा यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेचे संचालक राहुल रेखावर यांच्यासोबत शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा फिस्कटली. आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुणे येथे रेखावर यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान रेखावार हे निपुण महाराष्ट्र उपक्रम हा ऑनलाइन पद्धतीने करण्यावर ठाम राहिले. तर शिक्षक संघटनांनी, ऑफलाइनचा आग्रह धरला. यामुळे बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी, ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम असल्याचे म्हटले आहे. शिष्टमंडळातर्फे, रेखावार यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये निपुण महाराष्ट्र उपक्रम ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम असल्याचे म्हटले आहे.
आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात शिक्षक नेते राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, भरत रसाळे, सुधाकर सावंत, प्रमोद तौंदकर, सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, गौतम वर्धन, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, दिलीप माने, प्रकाश मगदूम, संजय जगताप, मंगेश धनवडे, गजानन कांबळे, सदाशिव शिंदे, सुरेश सोनगेकर, तानाजी धरपणकर, उमेश देसाई, डी. पी. पाटील, ए. के. पाटील आदींचा समावेश होता. याप्रसंगी झालेल्या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी, ‘ऑनलाइन पद्धतीने काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. निपुण महाराष्ट्र उपक्रमाचे काम करायला आमची तक्रार नाही, पण ते काम ऑफलाइन पद्धतीने असायला हवे.’यावर भर दिला. यावर रेखावार यांनी, ‘निपुण महाराष्ट्र उपक्रम हा पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापुरात राबविण्यात येत आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारेच हे काम करावे लागेल. यातील अडचणी दूर करू. मात्र ऑफलाइनचा आग्रह धरू नका.’अशी भूमिका मांडली.
आमदार आसगावकर यांनी, शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा भडिमार नको. यामुळे शिक्षक अशैक्षणिक कामात अडकून पडतात. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. निपुण महाराष्ट्र उपक्रम ऑफलाइन पद्धतीने राबवावी.’असा मुद्दा मांडला. ऑनलाइन की ऑफलाइन यावरुन या बैठकीत एकमत झाले नाही. रेखावार हे ऑनलाइन प्रणालीवर ठाम होते, तर शिक्षक संघटनांचे शिष्टमंडळ ऑफलाइन पद्धतीने हा उपक्रम राबवावे यावर कायम राहिले. यामुळे चर्चा पुढे सरकली नाही. चर्चा अर्ध्यावर सोडून संघटनेचे प्रतिनिधी बैठकीतून बाहेर पडले. आणि निपुण महाराष्ट्र उपक्रमाच्या ऑनलाइन प्रणाली कामावर बहिष्कार कायम असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.