सीईटी सेलचे गणित चुकले, पंधराहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे पर्यायच चुकीचे ! सीएमओ ऑफिसकडे तक्रार !!
schedule27 Apr 25 person by visibility 152 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सध्या सीईटी सेलतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षा सुरू आहे. यातंर्गत रविवारी (२७ एप्रिल २०२५) झालेल्या शिफ्ट वनमधील पेपरमध्ये गणित विषयांशी निगडीत पंधराहून अधिक प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्यायच दिले नव्हते अशी तक्रार विद्यार्थी व पालकांतून होत आहे. उत्तरादाखल दिलेले चारही पर्याय चुकीचे होते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सीईटी सेलकडून सुरू असलेल्या परीक्षेत गणित विषयाशी निगडीत पेपरमध्ये चुका झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीईटी सेलकडून आता पुन्हा परीक्षा होणार का ? अशी विचारणा होत आहे.
अभियांत्रिकीसाठी २०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये फिजिक्स विषयाशी निगडीत ५० गुण, केमिस्ट्री विषयाशी निगडीत पन्नास गुण आणि गणिताशी निगडीत १०० गुण असतात. एक प्रश्न दोन गुणासाठी असतो. रविवारी, २७ एप्रिल रोजी झालेल्या शिफ्ट वनमध्ये गणित विषयातील प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय दिले नसल्याने सीईटी सेलकडून जी चूक झाली आहे त्याबद्दल काही पालकांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे मेलद्वारे तक्रार नोंदविली आहे. सीएमओ ऑफिसच्या टविटरवरही टॅग केले आहे.
सीईटी सेलकडून १९ एप्रिलपासून परीक्षा सुरू आहेत. रविवारी, २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रातील शिफ्ट वन अंतर्गत गणित विषयाचा पेपर होता. पन्नास प्रश्नांची हा पेपर होता. पंधराव्या शिफ्टमधील या पेपरमध्ये पंधराहून अधिक प्रश्न चुकीचे होते, कारण या प्रश्नांचे उत्तराचे योग्य पर्यायच दिले नाहीत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एका प्रश्नासाठीच्या उत्तरांच्या पर्यायमध्ये दोन पर्याय एकसारखे होते. अन्य प्रश्नांतील चारही पर्याय योग्य नव्हते याकडे विद्यार्थी लक्ष वेधत आहेत.
सीईटी सेल आता या चुकीवर काय उत्तर शोधणार ? असा सवालही पालक करत आहेत. पुन्हा पेपर घेणार की सरसकट गुण देणार ? या साऱ्याचा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर, पर्सेंटालइमध्ये काय फरक पडणार ? कोणाला फायदा होणार ? कोणाला फटका बसणार ? की चुकीच्या सगळया प्रश्नांना बोनस गुण मिळणार का ? अशा प्रश्नांनी विद्यार्थी आणि पालक भयभीत झाले आहेत.