ज्ञानदानाला दातृत्वाची जोड देत प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी दिला विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार – इंद्रजीत देशमुख
schedule27 Apr 25 person by visibility 131 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ज्ञानदानाला दातृत्वाची जोड देत प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्यात उभे केले. ऐश्वर्य, औदार्य व स्वातंत्र्य हे ज्यांच्याकडे असतात तेच दातृत्व करू शकतात. चांगुलपणामुळेच जीवन सफल बनते हा त्यांचा कृतीशील विचार मानवतेवरील विश्वासही दृढ करतो. ’ माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी काढले.
येथील स. म. लोहिया हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस. एस. चव्हाण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळयात ते बोलत होते. . दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. याप्रसंगी प्राचार्य चव्हाण व सुनिता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे सत्काराचे स्वरुप आहे. राम गणेश गडकरी सभागृह परिसरात हा दिमाखदार सोहळा झाला. याप्रसंगी सुर्यकांत’ गौरव ग्रंथांचे प्रकाशन झाले.
आमदार जयंत आसगावकर यांनी ‘प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी विविध क्षेत्रात काम केले. विद्यार्थी घडविले. संस्थेने ज्या जबाबदाऱ्या सोपविल्या, त्या पार पाडल्या.’अशा शब्दांत गौरवोद्गार काढले. साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, ‘राज्यातील अनेक शिक्षण संस्था आज संस्थान बनल्या असताना दि न्यू एज्युकेशन सोसायटी मात्र एक कुटुंब म्हणून काम करते. याचा अभिमान आणि आनंद आहे. प्राचार्य चव्हाण हे क्रियाशील व्यक्तिमत्व आहे. प्राचार्य प्रभाकर हेरवाडे आणि प्राचार्य चव्हाण हे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासनाचे दोन चाके आहेत.संस्थेने आता कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे कॉलेज सुरू करुन त्याची धुरा या दोन प्राचार्यांवर सोपवावी.’ प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी प्राचार्य चव्हाण यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला. शिक्षकांना प्रोत्साहित केले. त्यांच्याकडून दातृत्वाचा गुण स्वीकारावा.’असे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना विनोदकुमार लोहिया यांनी प्राचार्य चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
संस्थेचे अध्यक्ष पदमाकर सप्रे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मलकुमार लोहिया, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर, नेमचंद संघवी, माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शिक्षणाधिकारी किरण लोहार, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, अशोक रोकडे, गौरव समितीचे सचिव अमोल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. गौरव समितीचे स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी प्रास्ताविक केले. कलाशिक्षक सागर बगाडे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. स्नेहा फडणीस, शितल हिरेमठ, निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. गौरव समितीचे कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी आभार मानले.
………….
माझ्या दृष्टीने भाग्याचा दिवस…प्राचार्य एस. एस. चव्हाण
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य एस. एस. चव्हाण यांच्या वाटचालीवर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य चव्हाण यांनी जीवनप्रवास उलगडला. ‘आई, बहिण, भाऊ, कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये माझा गौरव समारंभ होत आहे, ह माझ्या दृष्टीने खूप भाग्याचे आहे. शिक्षक, प्राचार्य, सहसचिव अशा विविध पदावर काम करताना शाळा, संस्थेसाठी काही योगदान देता आले. हा सारा प्रवास अनुभवसंपन्न होता. संस्थेने विश्वास दाखविला. शाळेतील सहकाऱ्यांनी साथ दिली. गुरुवर्य बोरकर यांच्यामुळे जीवनाला आकार मिळाला. ‘आयुष्यात चांगले काम करायचे’ही आजोबांची शिकवण आहे. आजोबांच्या विचारांचा आमच्या कुटुंबावर प्रभाव आहे. तो विचार जोपासत यापुढेही काम करत राहू.’अशा भावना चव्हाण त्यांनी व्यक्त केल्या.
………….
संस्थेला दीड लाखाची देणगी, सेवाभावी संस्थांना अर्थसहाय्य
सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला सामाजिक कार्याची झालर लाभली. प्राचार्य चव्हाण यांनी सेवानिवृत्तीचे औचित्य साधून दि न्यू एज्युकेशन सोसायटीला दीड लाख रुपयांची देणगी दिली. तर उम्मेद फाऊंडेशन, शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आणि चिल्लर पार्टीचे संयोजक मिलिंद यादव यांना अर्थसहाय्य केले.