टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणातील ज्युनिअर कॉलेजमधील दोन प्राध्यापक निलंबित
schedule02 Dec 25 person by visibility 34 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटीच्या प्रकरणातील बिद्री येथील ज्युनिअर कॉलेजमधील दोघा प्राध्यापकांवर मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) निलंबनाची कारवाई झाली. शिक्षण संस्थेने पेपर फुटी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबित केलेल्या शिक्षकांची नावे अभिजीत विष्णू पाटील व रोहित पांडूरंग् सावंत अशी आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी टीईटीचा पेपर होता. ज्या दिवशी पेपर होता, त्याच्या अगोदरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलिसांनी सोनगे येथील फर्निचर मॉलवर छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी अकरा जणांना अटक केली. कराड येथील महेश गायकवाड हा पेपर फुटी प्रकरणातील सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत १९ जणांना अटक केली आहे. सध्या ते कोठडीत आहेत. दरम्यान पेपर फुटी प्रकरणात सिनीअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, सिनीअर कॉलेजमधील प्राध्यापक ही सापडले आहेत. सोळांकूर येथील कॉलेजचे प्रभारी प्राचार्य गुरुनाथ चौगले व मिरज येथील महाविद्यालयातील सिनीअर कॉलेजचे प्रा. अमोल जरग यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. शिक्षण संस्थेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. बिद्री येथील ज्युनिअर कॉलेजमधील दोन प्राध्यापक या प्रकरणात सापडले होते. पोलिसांनी त्या दोघा प्राध्यापकांनाही अटक केली आहे. दरम्यान या प्राध्यापकावर कारवाई करण्यासंबंधी शिक्षण संस्थेने शिक्षण उपसंचाल कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी कारवाई करण्यासंबंधी कळविले. त्यानुसार शिक्षण संस्थेने ज्युनिअर कॉलेजमधील प्रा. पाटील व प्रा. सावंत यांना सेवेतून निलंबित केले आहे. शिक्षण संस्थेने यासंबंधी शिक्षण विभागालाही कळविले आहे.