जिप आरक्षणात उलटफेर ! इंगवले, घाटगे, महाडिक, निंबाळकर, पाटील, मगदूमांना धक्का !!
schedule13 Oct 25 person by visibility 374 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये प्रवर्ग बदलल्याने गेल्या सभागृहातील अनेक दिग्गजांना धक्का बसला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती यांच्यासह कारभारी सदस्यांचा समावेश आहे. मंत्र्यांचे समर्थक व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही आरक्षणाने झटका दिला आहे. यामुळे मिनी मंत्रालयात पुन्हा सदस्य म्हणून येण्यासाठी त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. निवडणूक लढवायची म्हणून अनेक जण गेल्या काही महिन्यापासून तयारी करत होते. मात्र आरक्षणामुळे काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम अशी स्थिती निर्माण झाली.
गेल्या सभागृहामध्ये पुलाची शिरोली या मतदारसंघातून निवडून आलेल्या व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेल्या शौमिका महाडिक यांच्या पुलाची शिरोली या मतदारसंघात यंदा ओबीसी आरक्षण पडले आहे. यामुळे महाडिक यांना या हक्काच्या मतदारसंघातून लढण्याची संधी कमी आहे. हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 11 जागा आहेत यापैकी सहा जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर झाल्या. आळते मतदारसंघातून सातत्याने निवडून येणारे अरुण इंगवले यांना आरक्षण सोडते म्हणजे धक्का बसला आळते मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक सतीश पाटील हे गेल्या वेळेला गिजवणे मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा आरक्षण सोडतीमध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव जाहीर झाला. यामुळे सतीश पाटील यांची या मतदार संघातून संधी हुकली. आता त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कागलच्या राजकारणात नेहमीच गुलाल उधळणाऱ्या गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांचा सिद्धनेर्ली हा मतदारसंघ यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. यामुळे या मतदारसंघातून घाटगे यांची संधी हुकली त्यांनाही दुसरा मतदार संघ शोधावा लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर हे गेल्या वेळेला यड्राव मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा हा मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यामुळे मतदार संघ त्यांना गमवावा लागला. भादोले मतदारसंघातून गेल्यावेळी निवडून आलेले मनीषा विजयसिंह माने यांनाही यंदा दुसरा मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे. गेल्यावेळी रुकडी मतदार संघातून निवडून आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य पद्मावती राजेश पाटील यांना धक्का बसला. रूकडी हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर झाला आहे. कोरोची मतदार संघातील माजी सदस्य प्रसाद खोबरे यांना पुन्हा या मतदारसंघातून निवडून निवडणूक लढविण्याची संधी हुकली. हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाला आहे. यामुळे खोबरे यांना त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना रिंगणात उतरवण्याची संधी आहे. कबनूर येथील भारतीय जनता पक्षाच्या सदस्य विजया पाटील यांनाही आरक्षण सोडतील नुसार मतदारसंघ सोडावा लागला कबनूर हा मतदारसंघ नव्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वंदना मगदूम यांनाही पटणकोडोली मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी नाही कारण हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव झाला. माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनाही हा धक्का आहे कारण तेही या मतदारसंघातून तयारी करत होते. मिनी मंत्रालय गाठण्यासाठी त्यांना आता दुसरा मतदार संघ शोधावा लागणार आहे. दानोळी मतदारसंघातून निवडून आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुभांगी रामचंद्र शिंदे यांनाही निवडणूक लढविण्यासाठी नवीन मतदारसंघ शोधावा लागेल. कारण दानोळी मतदारसंघ हा एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. गेल्या वेळेला अब्दुललाट मतदार संघातून निवडून आलेले सदस्य विजय भोजे यांनाही या वेळेला नवीन मतदारसंघ शोधावा लागेल. कारण यंदा अनुसूचित जमातीसाठी नांदणी हा मतदारसंघ राखीव झाला आहे. तर अब्दुल लाट हा मतदारसंघ एससी महिला प्रवर्गाकरिता राखीव आहे
मंत्री मुश्रीफ यांचे समर्थक व गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनाही आरक्षणामुळे यंदा कसबा सांगाव मतदार संघातून निवडणूक लढविता येणार नाही कसबा सांगाव मतदारा संघ हा एससी प्रवर्गासाठी आरक्षण झाला आहे. तिसंगी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील यांची या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी हुकली कारण हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे यामुळे पाटील यांना आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांना संधी द्यावी लागणार आहे. चंदगड तालुक्यातील चारही जागा यंदा महिलासाठी आरक्षित झाल्या. त्यामुळे मावळत्या सभागृहातील सदस्य कलापणा भोगण, सचिन बल्लाळ, अरुण सुतार यांना निवडणूक लढविता येणार नाही तसेच माजी सदस्य विद्या पाटील यांचे पती विलास पाटील यांचीही निवडणूक लढण्याची संधी हुकली. भुदरगड तालुक्यातील मावळत्या सभागृहातील गारगोटी मतदारसंघातील रेश्मा राहुल देसाई, पिंपळगाव मतदारसंघातील रोहिणी आबिटकर यांना पुन्हा लढण्याची संधी आहे. तर कडगाव मतदार संघातील सदस्य स्वरूपाराणी जाधव यांनाही परत संधी आहे. आकुर्डे मतदारसंघातील माजी सदस्य जीवन पाटील यांची मात्र य लढण्याची संधी हुकली. हा मतदारसंघ ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यांच्या पत्नी निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. उत्तूर मतदारसंघातून उमेश आपटे यांना पुन्हा संधी आहे ळ. नेसरी येथून हेमंत कोलेकर यांना परत निवडणूक लढवता येऊ शकते. पन्हाळा तालुक्यातील प्रा. शिवाजी मोरे, प्रियांका पाटील यांना परत निवडणूक लढवण्याची संधी आहे. माजी सदस्य शंकर पाटील यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना रिंगणात उतरावे लागणार आहे. कारण कोतोली मतदारसंघा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला. कुंभोज मतदार संघ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे या मतदारसंघात गेल्या वेळेला प्रवीण यादव निवडून आले होते मतदार संघातील आरक्षण बदलल्यामुळे यादव यांना हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला. गोकुळ शिरगाव मतदार संघ सर्वसाधारण असल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांना पुन्हा संधी आहे. पाचगाव मतदार संघ हा सर्वसाधारण आहे या ठिकाणी काँग्रेसकडून पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील व भाजपकडून ग्रामपंचायतचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, त्यांचे पुत्र सौरभ गाडगीळ, महेश पाटील, सागर दळवी अशी अनेक नावे चर्चेत आहेत
बोरवडे मतदार संघ सर्वसाधारण महिलेसाठी आहे. यामुळे या मतदारसंघातून माजी सदस्य मनोज फराकटे यांची संधी हुकली. शिक्षण समितीच्या माजी सभापती रसिका पाटील यांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची संधी आहे. शिंगणापूर मतदारसंघ हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. बांधकाम समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील यांना पुन्हा लढण्याची संधी आहे.हा मतदारसंघ सर्वसाधारण आहे. येवलुज येथील सदस्या कल्पना केरबा चौगुले यांना संधी मिळू शकते तर कळे मतदारसंघ हा ओबीसी महिलांसाठी आरक्षण झाला यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी संधी हुकली. सडोली खालसा हा मतदारसंघ सर्वसाधारण गटातील आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण असणारे याकडे लक्ष आहे तर नव्याने आकाराला आलेल्या पाडळी खुर्द या मतदारसंघात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, अमर पाटील यांच्यासह आण काहीजण तयारी करत आहेत. राधानगरी, वडणगे, निगवे खालसा, पेरणोली रेंदाळ सातवे हे मतदारसंघ सर्वसामान्य या ठिकाणी मोठी गर्दी असणार आहे .