आयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाख
schedule30 Mar 26 person by visibility 243 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर सरकारी जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई वॉर्ड येथील मौजे कसबा करवीर येथील रि.स.नं.५८३, ५८७ व ५८८ मधील कृषी विभागाच्या ताब्यातील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना कब्जेहक्काने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आय.टी.पार्कचा विषय जागेच्या दरामुळे रखडला जावू नये. जागा कमीत कमी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशील होते. परंतु, ३१ मार्च नंतर नवीन दराने जागेचे बाजारमूल्य सुमारे १५ टक्केनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यापूर्वीच जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आमदार क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशील होते.
याकरिता २०२५ - २६ चे बाजारमुल्य तक्त्यातील दरानुसार जमिनीचे एकत्रित मुल्यांकन.५,६०,२३,९८० रुपये इतके निश्चित करण्यात आले. ही रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे. रक्कम नवीन २०२६ - २७ नुसार नवीन वार्षिक बाजार मुल्यदरानुसार भरावी लागणार असल्याचे पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ३० मार्च रोजी प्राप्त झाले. याबाबत संबधित विभागाने ही बाब राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. याबाबत क्षीरसागर यांनी तात्काळ उद्योग मंत्री आणि सचिव, उद्योग विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला. रक्कम तात्काळ भरण्याबाबत मंत्रालय स्तरावरून आदेश देण्याची मागणी केली. त्यानंतर सरकारी यंत्रणा गतिमान होवून सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संबंधित रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडे जमा केले आहे. त्यामुळे आय.टी.पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर झाला आहे.