+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule15 Sep 24 person by visibility 243 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची (सुटा) रविवारी झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी झाली. संघटनेच्या घटना दुरुस्तीवरुन निर्माण झालेल्या वादाचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले. घटना दुरुस्तीवरुन सुटामध्ये समर्थक व विरोधक असे दोन गट पडले असून दोन्ही बाजूनी आपआपले म्हणणे जोरदारपणे मांडले. दोन्हीकडील वाद प्रतिवादामुळे सभा एकदा तहकूब करण्यात आली. दरम्यान समर्थकांनी घटना दुरुस्तीचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे म्हटले तर सुटा बचाव संघर्ष समितीने घटना दुरुस्तीचा ठराव आवाजी मतदानाने नामंजूर केल्याचे म्हटले. या गोंधळातच सभा संपली. सभेच्या अहवालातही खाडाखोड झाल्याचा आरोप सभेनंतर झाल्यामुळे वादाचे कवित्व कायम राहिले.
सुटाच्या घटना दुरुस्ती ठराव विषय हा महिनाभर गाजत आहे. सुटाचे अध्यक्ष आर. के. चव्हाण, घटना दुरुस्ती समितीचे निमंत्रक आर. जी. कोरबू, विश्वस्त सुधाकर मानकर हे मनमानी पद्धतीने कारभार करत असून संघटनेवर एकहाती सत्ता मिळावी म्हणून घटनेत बदल करत आहेत असा आरोप सुटा बचाव संघर्ष समितीने केला होता. तर संघटनेच्या हितासाठी व प्राध्यापकांच्या भल्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्यात येत आहे. कार्यकारिणीने घटना दुरुस्तीची शिफारस केली आहे. असा दावा समर्थकांनी केला होता. रविवारी, पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा विषय मान्यतेसाठी विषयपत्रिकेवर होता. दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात झाली. सुटाचे अध्यक्ष चव्हाण हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
सभेत घटना दुरुस्तीचा विषय हा दोन नंबर क्रमांकाचा होता. प्रा. टी.व्ही. स्वामी यांनी घटना दुरुस्तीचा मसुदा वाचून दाखविला. सभेपुढे या विषयाचे वाचन होताच समर्थक व विरोधक यांच्यातील वादाला तोंड फुटले. “सुटाच्या सभासद प्राध्यापकांना विश्वासात न घेता घटनेत दुरुस्ती करणे गैर आहे. घटना दुरुस्ती करुन संघटना ताब्यात ठेवण्याचा प्रकार हा नियमबाह्य आहे. संघटनेत एकहाती सत्ता नको” असे सुटा बचाव संघर्ष समितीने म्हटले. सुटा बचाव संघर्ष समितीकडून प्रा. अर्जुन जाधव, संतोष जेठीथोर, गुंडोपंत पाटील, युवराज् पाटील यांनी सभासदांचा घटना दुरुस्तीला विरोध असल्याचे सांगितले.
सुटाचे अध्यक्ष चव्हाण, घटना दुरुस्ती समिती निमंत्रक कोरबू, प्रा. प्रकाश कुंभार यांनी घटना दुरुस्ती का गरजेची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सीएचबी प्राध्यापकांना तात्पुरत्या स्वरुपात सभासद म्हणून संघटनेत सामावून घेणे, सुटामधील सर्व पदांचा कालावधी दोन वर्षावरुन तीन वर्षे करणे यासह अन्य कारणासाठी घटना दुरुस्ती आवश्यक असल्याचे मांडले.
याविषयावर दोन्ही बाजूनी जोरदार म्हणणे मांडण्यात आले. सभेत वादावादीचे प्रसंग उद्भवले. एकमत होऊ न शकल्यामुळे सभा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तहकूब करण्यात आली. पुन्हा सभेला सुरुवात झाली. पण वाद काही मिटला नाही. या गोंधळातच आवाजी मतदानावर यासंबंधी निर्णय घेण्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. एकाचवेळी मंजूर,मंजूर व नामंजूर, नामंजूर असे मोठया आवाजात ओरडून समर्थन व विरोध सुरु होता. समर्थकांनी घटना दुरुस्तीचा ठराव मंजूर झाल्याचे म्हटले तर सुटा बचाव संघर्ष समितीने घटना दुरुस्तीचा ठराव नामंजूर झाल्याचे म्हटले.
……………….
“संघटनेच्या घटनेत बदल करण्याचा ठराव हा सुटाच्या कार्यकारिणीत एकमताने मंजूर झाला. तर सर्वसाधारण सभेत हा ठराव आवाजी बहुमताने मंजूर झाला. पाच तासहून अधिक वेळ सभा चालली. संघर्ष समितीतील एका सभासदाने, प्रा. टी.व्ही. स्वामी यांचा सभेत अवमान करत सभेला गालबोट लावले.”
- प्रा. डॉ. आर. जी. कोरबू, निमंत्रक घटना दुरुस्ती समिती
………………………………………………………………………….
“ घटनेत बदल करताना सर्व प्राध्यापक सभासदांना विश्वासात घ्यायला हवे. पण काही मंडळी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. सर्वसाधारण सभेत सभासदांनी आवाजी मतदानाने हा ठराव नामंजूर केला. घटना दुरुस्तीचा डाव हाणून पाडला. सभेत सभासदांन बोलावे ही संघर्ष समितीची भूमिका होती. त्यामुळे कोणाचा अवमान करण्याचा उद्देश सभासदांचा नव्हता.”
- प्रा. डॉ. अरुण पाटील, सहनिमंत्रक, सुटा संघटना बचाव संघर्ष समिती