बांधकाम क्षेत्रातही पुढील तीस वर्षात एआयचे परिणाम जाणवणार – आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले
schedule02 Feb 26 person by visibility 6 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय क्षेत्र, कृषि, संरक्षण अशा अनेकविध क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. बांधकाम क्षेत्रातही पुढील तीस वर्षात एआयचे परिणाम्घ् जाणवणार आहेत. एआयचा चांगले परिणाम आहेत तसेच दुष्परिणामही आहेत. एआयमुळे जितक्या संधी दिसतात तशा नोकऱ्यांवरही मर्यादा येणार आहेत. यामुळे एआयचा वापर जपून करण्याची चळवळ सुरू करावी लागणार आहे. चीन आणि रशियासारख्या देशातही अशी चळवळ सुरू झाली आहे.’असे मत आयटीतज्ज्ञ व व्याख्याते अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे येथील महासैनिक दरबार हॉल येथे दालन २०२६ प्रदर्शन भरविले आहे. ३० जानेवारी ते दोन फेब्रुवारी २०२६ असा प्रदर्शनाचा कालावधी आहे. रविवारी, एक फेब्रुवारी रोजी गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ‘एआय आणि बदलते जग’हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालनचे चेअरमन महेश यादव, विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष चेतन वसा, प्रकाश देवलापूरकर, गणेश सावंत, संग्राम दळवी, निखिल शहा व्यासपीठावर होते. क्रीडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष आदित्य बेडेकर यांनी व्याख्याते गोडबोले यांचा परिचय करुन दिला.
जवळपास सव्वा तासाच्या व्याख्यानात गोडबोले यांनी तंत्रज्ञानामुळे बदलत्या जगाची ओळख करुन दिली. जगभरातील घटनांचा दाखला देत त्यांनी एआयचे फलित आणि धोके या दोन्हीची जाणीव करुन दिली. ‘रोबोटेक्सट, चॅटजीपीटी आता एआय सातत्याने बदल घडत आहेत. बदलते तंत्रज्ञान आणि एआयचा अवलंब कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतो. कलाक्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. तंत्रज्ञानाचा आधार घेत गीतरचनापासून संगीत संयोजनापर्यतचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामुळे गीतकार, वादक, संगीतकार हे पुढील काळात कसे टिकून राहणार ? ’असा प्रश्न पडत असल्याचे गोडबोले म्हणाले.
एआयमुळे अनेक क्षेत्रात झपाटयाने बदल होत आहे. नोकऱ्यावर मर्यादा पडणार आहेत. काही जाणकारांचे म्हणणे आहे की ६७ टक्के नोकऱ्या कमी होतील. माझे म्हणणे आहे की वीस टक्केच्या आसपास नोकऱ्या जातील. मात्र घाबरून न जाता त्यातील संधी शोधल्या पाहिजेत. तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. बांधकाम क्षेत्रावरही भविष्यात परिणाम होऊ शकतात. रियल इस्टेटमध्ये काय काय बदल होणार ? मोठ्या ऑफिसेसची गरज भासणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. आपल्याकडे या साऱ्या प्रक्रियेला जवळपास तीस वर्षाचा कालावधी लागेल असे सांगत त्यांनी रियल इस्टेट व्यावसायिकांना आश्वस्त केले.