पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा : मंत्री पंकजा मुंडे
schedule03 Sep 26 person by visibility 8 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘पशुवैद्यकीय विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा थेट उपयोग पशुपालकांच्या जीवनमानात व उत्पन्नात वाढ करण्यासाठी झाला पाहिजे. पशुधनाचे आरोग्य, उत्पादकता आणि व्यवस्थापन सुधारल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालयांनी केवळ पदवी देणाऱ्या संस्था न राहता पशुपालकांच्या समस्या सोडविणारे ज्ञान व तंत्रज्ञान केंद्र म्हणून काम करावे./असे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
श्री सिद्धगिरी मठ, कणेरी येथे श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुपालक मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मुंडे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.
मंत्री मुंडे म्हणाल्या, “पशुपालकांच्या दारापर्यंत आधुनिक पशुवैद्यकीय सेवा आणि तंत्रज्ञान पोहोचणे ही आजची गरज आहे.” पशुधनातील आजारांचे वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक लसीकरण, संतुलित पशुआहार, प्रजनन व्यवस्थापन आणि आधुनिक पशुपालन पद्धतींचा अवलंब यामुळे पशुपालकांच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर स्थानिक पातळीवर व्यवहार्य उपाय विकसित करण्यासाठी संशोधन करावे.
परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आणि समाजसेवा असले पाहिजे, असा संदेश दिला. कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी कार्यक्रमप्रसंगी संबोधित केले, कणेरी मठ येथे पशुधनाच्या आरोग्यासाठी पशुवैद्यक निर्माण होत असल्याचा आनंद आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. संचालक शिक्षण व अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया महेश शिंदे, माजी कुलगुरू डॉ. के. एम. एल. पाठक, शिरवळ येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रमोद बाबर, गोकुळ दूध संघाचे डॉ. चंद्रकांत परुळेकर, चितळे डेअरीचे विश्वास चितळे, यशवर्धन बारामतीकर, जी. पी. वड्ड, ए. मुरुगप्पा,सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील डॉ. रवींद्र सिंह, आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमादरम्यान श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय व गोकुळ सहकारी दुध संघ यामध्ये पशुचिकीत्सालयीन सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्यासाठी सामंज्यस्य करार करण्यात आला. पशुपालक मेळावा कार्यक्रमामध्ये डॉ. मार्कंडेय, डॉ. अंकुश परिहार, प्रशांत योगी, डॉ. दिनेश टाकळीकर, डॉ. सुनील राउतमारे यांनी मार्गदर्शन केले.