प्रभागातील विकासकामे तुमच्यामुळेच, आम्ही तुमच्यासोबत- उमा बनछोडेंना मिळतोय मतदारांचा पाठिंबा
schedule11 Jan 26 person by visibility 31 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तुमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. गेल्या सभागृहात नगरसेविका म्हणून तुम्ही ज्या तळमळीने प्रभागासाठी काम केलात, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत…’ प्रभाग क्रमांक सातमध्ये काँग्रेसच्या उमेदवार उमा शिवानंद बनछोडे यांना ठिकठिकाणी मतदारांचा असा प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. रोज सकाळी आणि संध्याकाळी पदयात्रा, कॉर्नर सभा सुरू आहेत. घर टू घर संपर्कावर साऱ्यांचा भर आहे. प्रचाराच्या या धामधुमीत उमेदवारांना काही सुखद अनुभव येत आहेत. प्रभाग क्रमांक सातमध्ये काँग्रेसकडून उमा बनछोडे, नितीन ब्रह्मपुरे, शिवसेना ठाकरे पक्षाकडून सुप्रिया सागर साळोखे, राजेंद्र शंकर जाधव हे उमेदवार आहेत. काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ उमेदवार बनछोडे या प्रभागातील विविध भागातील मतदारांशी संपर्क साधत आहेत.
त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. महिला मतदारांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. कुठे बुके देऊन स्वागत होते तर कुठे ओवाळून. उमा बनछोडे यांनी २०१५ ते २०२० या कालावधीत बाजारगेट प्रभागातून नगरसेविका म्हणून प्रभावी काम केले आहे. प्रभागातील पाणी पुरवठयाचा विषय, गाळेधारकांचा भाडेकराराचा प्रश्न सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पापाची तिकटी येथील छत्रपत संभाजी महाराज स्मारक सुशोभिकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्मारक सुशोभिकरणाचे काम पूर्णत्वास आले. प्रचारादरम्यान मतदारांकडून त्यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांना उजाळा मिळत आहे. ‘तुमच्याकडूनच प्रभागातील विकासकामे होऊ शकतात. तुम्ही केलेली विकासकामे माहित आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत.’ अशा शब्दांत मतदार त्यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत.