राज्य नाट्य स्पर्धेसाठी पाच सप्टेंबरपर्यत प्रवेशिका सादर करण्याची मुदत
schedule26 Aug 24 person by visibility 231 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास पाच सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या वर्गवारीसाठी प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक २६ऑगस्ट हा होता.
मात्र काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून मंत्री मुनगंटीवार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास पाच सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.
या मुदतवाढ निर्णयाच्या अनुषंगाने, राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग बालनाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेले संघ, ऑनलाइन पद्धतीने दिनांक ५ सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करू शकतील असे प्रसिद्धीपत्रक सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. संबंधित संघानी https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.