कागलकर हाऊस परिसरात सरस प्रदर्शन सुरू ! महिला बचत गटांनी उत्पादित वस्तू उपलब्ध !!
schedule06 Jan 25 person by visibility 60 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय कोल्हापूर मिनी सरस प्रदर्शन सहा ते दहा जानेवारी २०२५ या दरम्यान कागलकर हाऊस, जुनी इमारत, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री हसनन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्ह्यातील लाखो महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने मिनी सरस सारखी प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका बनून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतील. प्रदर्शनातील कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ तसेच जिल्ह्यातील सर्व भागातील पदार्थांची चव चाखण्याची संधी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना मिळणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी.’
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई म्हणाल्या, जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी आणि ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिनी सरस प्रदर्शन उभारण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील वैविध्यपूर्ण चवींचे खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होत असल्याने या प्रदर्शनाच्या निमित्ताने मेजवानी मिळणार आहे.’ सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकरी मनिषा देसाई यांनी आभार मानले. याप्रसंगी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, वित्त व लेखाअधिकारी अतुल आकुर्डे, जल जीवन मिशन प्रकल्प संचालक माधुरी परीट, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.