कोल्हापुरात तीन दिवसीय संगीत महोत्सव ! राज्यस्तरीय भावगीत-नाट्यगीत गायन स्पर्धा !!
schedule07 Jan 25 person by visibility 69 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे माजी अध्यक्ष व रसिकाग्रणी स्वर्गीय मदनमोहन लोहिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन केलेल्या मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे दहा ते बारा जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय नाट्यगीत, भावगीत गायन स्पर्धा होत आहे. तसेच याच कालावधीत संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी दिली.
नवोदित व ज्येष्ठ कलाकरांसाठी राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धा भरविली आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता लहान गटाच्या भावगीताच्या स्पर्धा व दुपारच्या सत्रात नाट्यगीताच्या स्पर्धा होणार आहेत. शनिवारी, सकाळी ९ वाजता दुसऱ्या गटाच्या भावगीताच्या स्पर्धा आहणि दुपारी नाट्यगीताच्या स्पर्धा आहेत. रविवारी, सकाळी नऊ वाजता तिसऱ्य गटाच्या भावगीताच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातील गायकांनी नाव नोंदणी केल्याचे शीतल धर्माधिकारी यांनी सांगितले. रविवारी, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता नाट्यगीत व भावगीत गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आहे. सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत महोत्सव व गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
संगीत महोत्सवाविषयी हेरवाडे म्हणाले, ‘संगीत महोत्सवाची सुरुवात शुक्रवार, दहा जानेवारीपासून रोज सायंकाळी सहा वाजता होईल. पहिल्या दिवशी नाट्य अभंग रंग कार्यक्रम आहे. यामध्ये संगीत नाटकांच्या सुवर्णकाळातील पदे ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. गायक कलाकार श्रदधा जोशी, तेज मेस्त्री, अभिषेक तेलंग यांचा समावेश आहे. साथसंगत महेश देसाई, हर्षल काटदरे, धनंजय गुरव, केदार गुळवणी, सचिन पन्हाळकर हे करणार आहेत. निवेदक मनीष आपटे आहेत.
शनिवारी, ११ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मराठी पाऊल पडते पुढे हा गीतांचा सुरेल आविष्कार आहे. डॉ. शीतल धर्माधिकारी, डॉ. भाग्यश्री मुळे, गौतमी चिपळूणकर, प्रल्हाद जाधव, प्रसाद कुलकर्णी हे गायक कलाकार गीते सादर करणार आहेत. साथसंगत प्रशांत देसाई, संदेश खेडेकर, अमित साळोखे, शिवाजी सुतार, केदार गुळवणी, अजित पाटील, गुरु ढोले यांची आहे. रविवारी, १२ जानेवारी रोजी ‘स्वर शिल्प’ कार्यक्रमांतर्गत जुन्या हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आहे. गायक ऋषिकेश रानडे, मयुरा दातार यांचा गायन आविष्कार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत. पत्रकार परिषदेला सुर्यकांत चव्हाण, मोहन भांडवले, प्रसाद कुलकर्णी, तानाजी तिवले आदी उपस्थित होते.