नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule06 Jan 25 person by visibility 28 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला लवकरच तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात फडणवीस बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असताना मला आनंद होत असून जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले. नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजातील व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक नागपूर येथे भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सर्वश्री राजेंद्र पाटील - यड्रावकर, राहुल आवाडे, अमल महाडिक, अशोक माने, शिवाजी पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, दहा आचार्य महाराज, सात मुनी महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वस्तुत्व महाकाव्य ग्रंथाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने ‘प्रजागर्क’ पदवी देण्यात आली.