शिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !
schedule01 Sep 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांनी आंदोलने,मेळावे याद्वारे उमेदवारी ठसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाचही जिल्ह्यात संबंधितांनी संपर्क दौरे वाढविले आहेत. संचमान्यता, जुनी पेन्शन योजना याविषयवरुन उचल खाल्ली आहे. निवडणुकीचा कालावधी जवळ येऊ लागला आहे तशी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार कौस्तुभ गावडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, एकलव्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सक्रिय असलेले प्रा. सचिन सानप, पंढरपूर येथील श्री विठठ्ल एज्यकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे या संभाव्य उमेदवारांची चर्चा अधिक आहे.
मुळात शिक्षक मतदारसंघ हा पाच जिल्हा कार्यक्षेत्राचा आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेवर स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरचष्मा आहे. संघटनात्मक पातळीवर निवडणुका लढवायला हव्यात असा सूर असला तरी राजकीय पक्ष आणि नेते मंडळीचा हस्तक्षेप अविभाज्य आहे. पाच जिल्ह्यातील शिक्षक मतदारांपर्यत पोहोचून त्यांचा पाठिंबा मिळवणे हेच मोठे दिव्य ठरणार आहे.
विद्यमान आमदार आसगावकरांच्या पाच वर्षे आमदार म्हणून त्यांच्या काही जमेच्या बाजू आहेत. पुन्हा निवडणूक लढवायची म्हणून आसगावकर तयारीत आहेत. मात्र त्यांच्याससमोर यंदा आव्हाने अधिक आहेत. मागील निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. नेतेमंडळीकडे मंत्रीपदे होती. जिल्ह्यातील एकच उमेदवार म्हणून त्यांना पसंती होती. इतरांनी माघार घेतलेली. यंदा उलटे चित्र आहे. पाच वर्षात शिक्षक नेते, संघटनासह राजकारणातही उलथापालथी झाल्या. शिवाय यावेळी जिल्ह्यातून एकच उमेदवार हे सूत्र टिकणार नाही.
तगडे व तरुण उमेदवार म्हणून कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी समोर आली आहे. शिक्षक लोकशाही आघाडीने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे नेटवर्क आहे. जिल्ह्याजिल्ह्यात शाळा, संस्थांचे जाळे आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भाजप त्यांना पुरस्कृत करू शकतो. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते आवाज उठवित आहेत.
शिक्षकांच्या प्रश्नासाठी दिल्लीपर्यंत आंदोलन करणारे म्हणून दत्तात्रय सावंत यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. आमदार म्हणून काम केले आहे. त्या बळावर पुन्हा ते शड्डू ठोकत आहेत. विविध प्रश्नांवर त्यांचा पाठपुरावा करत असतात. त्याचवेळी आगामी निवडणुकीत नवीन चेहरे समोर असतील.शिवाय नजीकच्या काळात कोण, कोणासोबत राहणार यावर अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मंगेश चिवटे यांनीही शड्डू ठोकला आहे. त्यांनी, सांगली, सोलापुरात शिक्षकांचे मेळाव घेतले. या आठवडयात कोल्हापुरात मेळावा घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मदत कार्यात आघाडीवर राहून काम केलेला तरुण चेहरा म्हणून ते परिचित आहेत.मात्र शिक्षक मतदारसंघात पहिल्यांदाच पाऊल टाकले आहे.
मागील वेळी तयारी केली आणि ऐनवेळी थांबण्याचा निर्णय घेतलेले खंडेराव जगदाळे यंदा पुन्हा शिक्षक आमदारकीसाठी तयारी करत आहेत. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीच्या माध्यमातून सक्रिय आहेत. जिल्हयापासून मुंबईपर्यंत सदैव त्यांचा पाठपुरावा असतो. आंदोलनाच्या माध्यमातून वेगळी ओळख घडवली आहे. आंदोलने वेगळी आणि निवडणुकीचे तंत्र वेगळे याची जाणीव त्यांना आहे. निवडणुकीसाठी आवश्यक यंत्रणेत किती प्रभावी ठरतात हे महत्वाचे ठरेल. एकलव्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सक्रिय असलेले प्रा. सचिन सानप, पंढरपूर येथील श्री विठठ्ल एज्यकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे हे सुद्धा शिक्षक संपर्क दौरे काढत आहेत. सानप हे उद्योगमंत्री सामंत यांच्या जवळचे. डॉ. रोंगे हे अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात आहेत. त्यांनीही जिल्हानिहाय भेटीगाठी सुरू केल्या आहेत.या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या साऱ्याच उमेदवारांना निवडणुकीच्या शाळेत पास होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.