पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!
schedule01 Sep 26 person by visibility 12 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गणेशोत्सवामध्ये लेझरचा वापर करु नका. डीजेला बंदी नसली तरीही आवाजाची मर्यादा पाळा. मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्यावा. महाप्रसादाचे चेकिंग एफडीए मार्फत करण्यात येईल ,गणेशोत्सव कालखंडात पोलीस विभागातर्फे 24x7 एक कंट्रोल रूम कार्यरत ठेवण्यात येईल. गणेश मंडळांनी महाद्वार रोड ऐवजी इतर पर्यायी मार्गाचाही विचार करावा’असे आवाहन पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लोकप्रतिनिधी,गणेश मंडळ पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शांतता कमिटी सदस्य यांची गणेशोत्सव २०२६ अनुषंगाने सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, शहर उपअधिक्षक प्रिया पाटील , करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘कोल्हापूरने नेहमीच राज्याला एक वेगळी ओळख दिली आहे. राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्या - मुंबईच्या ऐवजी येथील गणेश उत्सव हा संपूर्ण राज्यात ' आदर्श गणेशोत्सव ' म्हणून ओळखला जावा. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेझरचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.’
जिल्हाधिकारी डॉ राठोड म्हणाले, उत्सवाद्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश द्यावा.त्याचबरोबर गरिबांना आवश्यक ते सहाय्य करावे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करून नो डीजे, नो डॉल्बी , नो लेझर असा हा उत्सव सर्व कोल्हापूरवासीयांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा.असे सांगून गणपती मंडळाचे डिपॉझिट एमएसईबीने सात दिवसात परत करावे यासाठी त्यांना आदेशित करू असे सांगितले. आयुक्त डॉ.भारूड म्हणाले,येत्या 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे.तोपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने शहरातील बहुतांशी खड्डे बुजवण्याला मनपा प्राधान्य देईल तसेच कोल्हापूरच्या या गणेशोत्सवाने राज्याला एक नवी दिशा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली .