थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले ! मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!
schedule28 Jul 26 person by visibility 41 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ‘थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ३५ टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणाऱ्या लिपिकांना नोटिसा देण्याचे तसेच अत्यल्प वसुली करणाऱ्यांचा पगार तातडीने रोखावेत’असे आदेश आयुक्त राजेंद्र भारुड यांनी दिले. पुढील महिन्यापर्यंत कामगिरीत सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोल्हापूर शहरातील थकीत घरफाळा वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीदार मिळकतधारकांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त भारुड यांनी घरफाळा विभागास दिले. भागाची लिपिकनिहाय आढावा बैठक घेणत आली.
शहरातील अनधिकृत मिळकती, भाडेकरू वापर असूनही मालक वापराप्रमाणे आकारणी झालेल्या प्रकरणांची तातडीने दुरुस्ती करून दंडासह वसुली करावी, तसेच अनधिकृत लॉजिंग व व्यावसायिक मिळकतींवर आवश्यकतेनुसार सीलची कारवाई करावी, असे आदेश दिले. थकबाकीदारांना तत्काळ नोटिसा व एसएमएस पाठविणे, शहरातील सर्व पात्र मिळकतींना घरफाळा आकारणी करणे आणि व्यावसायिक मिळकतींची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. नियमित घरफाळा भरणाऱ्या नागरिकांना त्रास न देता अधिकारांचा योग्य वापर करून थकबाकीदारांवर कारवाई करावी, तसेच दर १५ दिवसांनी वसुलीचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, करअधीक्षक अशोक यादव, मदन ठाणेकर, दत्तप्रसाद माजगांवकर, अच्युत अडुकर, अधिक्षक अर्चना प्रभावळे तसेच घरफाळा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
………………