जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!
schedule05 Oct 26 person by visibility 85 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुण्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकले. आमदार पाटील यांनी आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या साथीने सोमवारी पुणे शहरात प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. . पुण्यातील विविध नामांकित शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांना भेटी देऊन या नेत्यांनी संस्था चालक व व्यवस्थापनाशी थेट संवाद साधला. शिक्षक मतदारसंघात पुणे शहर आणि जिल्ह्यातील संस्थाचालकांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिल्याने आमदार पाटील आणि आमदार कदम यांनी पुण्यातील प्रमुख शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना वैयक्तिक भेटी देऊन काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठिशी राहण्याचे आवाहन केले. संस्था प्रमुखांसोबतच या दोन्ही नेत्यांनी महाविद्यालयांमधील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांचे, पगाराचे आणि पेन्शनचे प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, रफीक शेख, लहू निवंगुणे, भाऊसाहेब आजबे, प्रथमेश अबवणे, तौफिक मुल्लाण्णी यांच्यासह कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अभय छाजेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान आमदार जयंत आसगावकर हे मंगळवारी 6 ऑक्टोबर 2026 रोजी पुणे येथे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.