महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये येथे झालेल्या मंगेशराव (गणेश) कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेने अपेक्षेप्रमाणे सहजतेने अजिंक्यपद पटकाविले. अंतिम आठव्या फेरीत पहिल्या पटावर सात गुणासह आघाडीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद विरुद्ध सहावा मानांकित सातारचा अनिकेत बापट यांच्यातील लढतीत दोघांनी कोणताही धोका न पत्करता झटपट डाव बरोबरीत सोडविला.या बरोबरीमुळे सम्मेद साडेसात गुणासह अजिंक्य ठरला.
रोख सात हजार रुपये व पायोनियर चषक देऊन गौरवण्यात आले.दुसऱ्या पटावर देखील सातारचा ओंकार कडव विरुद्ध सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण यांच्यातील डावही बरोबरीत सुटला.तिसऱ्या पटावर इचलकरंजीच्या रवींद्र निकम ने गोव्याच्या विल्सन क्रूझवर मात करून सात गुणासह उपविजेतेपद पटकाविले.रवींद्रला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.चौथ्या पटावर जयसिंगपूरच्या दिव्या पाटीलने कोल्हापूरच्या सोहम खासबारदार वर विजय मिळवला.पाचव्या पटावर मिरजेच्या मुद्दसर पटेल ने गोव्याच्या प्रदीप कुलकर्णीला हरविले.सहाव्या पटावर जयसिंगपूरच्या दिशा पाटील वर कोल्हापूरच्या तुषार शर्माने मात केली.
दिव्या पाटील, मुदस्सर पटेल, अनिकेत बापट, ओंकार कडव, विक्रमादित्य चव्हाण व तुषार शर्मा या सर्वांचे समान साडेसहा गुण झालेमुळे सरस 43 बकोल्झ टायब्रेक गुणानुसार सातारच्या ओंकार कडवने बाजी मारली व तृतीय स्थान पटकावले त्याला रोख चार हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन निर्मलकुमार लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पायोनियर चे संचालक महेश कुलकर्णी, श्रीमती आशा मंगेशराव कुलकर्णी, मधुरा कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारूलकर, धीरज वैद्य उपस्थित होते. मंजिरी लिंगनूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आरती मोदी,करण परीट,प्रशांत पिसे,अभिजीत चव्हाण,विजय सलगर,किरण शिंदे,योगिता कुलकर्णी,विभूषा कुलकर्णी, जयसिंग पडवळ व जितेंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले.