गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !
schedule15 Mar 26 person by visibility 183 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापू जिल्हा सहकारी दूध उत्पाक संघामध्ये तीस वर्षात जे काम झालं नव्हतं, ते मागील पाच वर्षात केले. गोकुळ दूध संघाचा कारभार पारदर्शीपणे केला. दूध खरेदी दरात तब्बल चौदा रुपयांची वाढ दिली. म्हैस खरेदीला पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले. सचिवांच्या कमिशनात वाढ केली…राजकारणात, समाजकारणात काम करत असताना कृष्णासारखं कर्म करत राहायचं. फळाची अपेक्षा करायची नाही…फक्त कर्म करत राहायचं…’अशा शब्दांत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राजकीय टोलेबाजी करत गोकुळच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात रंग भरला.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा ६३ वा वर्धापनदिन १६ मार्च २०२६ रोजी आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या आवारात रविवारी, १५ मार्च रोजी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात गोकुळतर्फे उत्पादित आईस्क्रीम विक्रीचा शुभारंभ झाला. तसेच गोकुळला जादा दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. मागील निवडणुकीत ही सारी मंडळी एकत्र होती. गोकुळमध्ये दीड वर्षापूर्वी महायुतीचा अध्यक्ष झाला. काही संचालक शिवसेनेत गेले. गोकुळची आगामी निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चिन्हे आहेत. दरम्यान रविवारी झालेल्या गोकुळच्या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी महायुतीच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीमध्ये राजकीय टोलेबाजी केली. शिवाय महाडिक गटालाही डिवचले. गोकुळमध्ये अनेक वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक व दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.
भाषणात आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळचा कारभार आम्ही अतिशय चोख केला.मुंबई वाशीत गोकुळसाठी जागा खरेदी केली.पेट्रोल पंप सुरू केला. वाशीत दही प्रकल्प आहे. मागील तीस वर्षात जे काम झालं नाही, त्यापेक्षा अधिक काम आम्ही पाच वर्षात केले असे उदगार व्यासपीठावरील नेतेमंडळी व संचालक मंडळाकडे पाहत काढले. त्यावर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आम्ही त्या तीस वर्षात होते अशी टिप्पणी केली. त्यावर आमदार पाटील यांनी, ‘तुमच्याविषयी काही नाही, नेतृत्व चांगलं असलं की काम चांगले होते हे मला सांगायचे होते.’ अशा शब्दांत विरोधकांना टोला लगाविला. दुबईतून मला फोन आला होता, रोज एक लाख लिटर म्हैस दूध पाठवा. दोन रुपेय जादा दराने आम्ही ते विकत घेतो असे ते म्हणत आहेत. गोकुळच्या दुधाला मागणी वाढत आहे. मात्र आमच्याकडेच दूध कमी पडत आहे, त्यांना कुठून पुरवठा करणार ? असेही ते म्हणाले.
‘सतरा तारखेला गोकुळसंदर्भात सुनावणी आहे. सुनावणीअंती ठरेल निवडणुका केव्हा होणार ? निवडणुका केंव्हाही होऊ शकतात, त्यामुळे असा जाहीर कार्यक्रम हा आजचा शेवटचा ठरेल असे वाटते. सध्या सरकार म्हणंल तसं घडतं.’ अशी मिश्किल टिप्पणीही आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पाहत केली. ‘पाच वर्षापूर्वी, सभासदांनी ज्या विश्वासाने आमच्याकडे नेतृत्व सोपविलं ते सार्थ ठरविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. पुढील पाच वर्षाचा कृती आराखडाही आम्ही तयार केला आहे.यापुढेही दूध उत्पादकांचा आशीर्वाद आमच्या सगळयांच्या पाठीशी राहू दे.’असे आमदार पाटील यांनी म्हणताच कार्यक्रमस्थळी एकच हंशा उसळला.
……….....................................
मुलाच्या लग्नासाठी गोकुळची बारा लाखाची बासुंदी
आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळतर्फे विविध उत्पादने तयार केली जात आहेत. आता आईस्क्रीम तयार केले आहे. प्रत्येकाने गोकुळची उत्पादने विकत घ्यावीत. मी, मुलाच्या लग्नात बारा लाख रुपयांची बासुंदी घेतली आहे. त्या रकमेचा धनादेश गोकुळकडे दिला आहे. आपण ज्या संघाचे नेतृत्व करतो त्या गोकुळची उत्पादने विकत घेण्याची आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे. ’
……....................................................
प्रकाश आबिटकर, विनय कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे हे गोकुळमधील सत्ताधारी आघाडीत. वर्धापनदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यांच्या नावाचा उल्लेख होता. आबिटकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मात्र मंत्री आबिटकर, आमदार कोरे हे कार्यक्रमाला अनुपस्थित होते.तसेच माजी आमदार संजय घाटगे, ए. वाय. पाटील, संचालक अंबरिश घाटगे, शौमिका महाडिक, चेतन नरके, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड हे व्यासपीठावर दिसले नाहीत.