कोल्हापुरात तीन एप्रिलला सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण
schedule24 Mar 26 person by visibility 22 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून, फेडरेशनच्यावतीने ३ एप्रिल रोजी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि चर्चासत्र आयोजित केले आहे. सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना, सहकार सम्राज्ञी पुरस्काराने गौरवले जाणार आहे. राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा आणि भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने ३ एप्रिल रोजी कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन सभागृहात महिला मेळावा आयोजित केला आहे. सहकार चळवळीत महिलांचा सहभाग वाढावा, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. सहकार क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या यशस्वी महिलांचा सन्मान होणार आहे. त्यामध्ये बेस्ट चेअरमन, बेस्ट सीईओ आणि बेस्ट विक्री प्रतिनिधीसाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. सहकार सम्राज्ञी किताबा अंतर्गत पहिल्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. दुसर्या क्रमांकासाठी १५ आणि तिसर्या क्रमांकासाठी ११ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली.
खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रुपाराणी निकम आणि गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कामकाज कसे करावे, चेअरमन- व्हाईस चेअरमन आणि संचालकांची जबाबदारी, महिला संचालकांचा पतसंस्थांच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढवणे, महिला पतसंस्थांनी कोणत्या प्रकारच्या कर्ज वितरणावर भर द्यावा, ठेवी वाढवण्यासंबंधीचे उपाय, कर्ज वसुली यंत्रणा सक्षम कशी बनवावी, या संदर्भात मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील पतसंस्थांचे चेअरमन, उपाध्यक्ष, संचालक या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी ७८ ८८ २८ १२ ५१ आणि ९८ २२ २६ ९८ १३ ,९०७५२१७७८८ या क्रमांकावर नाव नोंदणी करावी. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर चौगुले, जवाहर छाबडा, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, चार्टर्ड अकौंटंट शिवराज मगर उपस्थित होते.