शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिर
schedule27 Sep 22 person by visibility 607 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात बुधवार (ता. २८ सप्टेंबर) पासून ३० सप्टेंबरपर्यंत तीनदिवसीय राष्ट्रीय-राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिर होत आहे.अशी माहिती कुलगुरू डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू पी. एस. पाटील यांनी दिली.
राज्य सरकारचे, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्या निर्णयानुसार २०२२-२३ या वर्षासाठी ही निवड चाचणी आहे. यापूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये सन २००६ व २०१६ मध्ये निवड शिबिराचे आयोजन झाले होते.
शिबिरात महाराष्ट्रातील २९ विद्यापीठांमधून एकूण ३१० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. यामध्ये १५३ मुले, १५७ मुली, आहेत. शिबिरात राष्ट्रीय-राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची परेड, वजन, उंची, मुलाखत, इत्यादींच्या माध्यमातून निवड प्रक्रिया होईल. तसेच सायंकाळच्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही आहे.
या निवड चाचणी शिबिराच्या माध्यमातून ३१२ विद्यार्थ्यांमधून ५६ विद्यार्थी पश्चिम विभागीय संचलनासाठी, १४ विद्यार्थी राष्ट्रीय पथसंचलनासाठी निवडले जाणार आहेत. उर्वरित ४२ विद्यार्थ्यांमध्ये आणखी ३८ विद्यार्थ्यांची निवड करून एकूण ८० विद्यार्थी राज्यस्तरीय पथसंचलनासाठी निवडले जातील.
शिबिराच्या निवड समितीमध्ये डॉ. कार्तिकेयन (क्षेत्रीय संचालक), डॉ. प्रशांतकुमार बनजे (राज्य संपर्क अधिकारी), अजय शिंदे (युवा अधिकारी), एनसीसी ऑफिसर्स, शारीरिक शिक्षण संचालक, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. अभय जायभाये सहभागी असतील.
शिवाजी विद्यापीठातून या शिबीरासाठी १२ मुली व १२ मुले असा २४ स्वयंसेवकांचा संघ सहभागी होणार आहे. डॉ. एन. बी. माने (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा) व डॉ. सुनिता तेलशिंगे (श्री. अण्णासाहेब डांगे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले) हे संघ व्यवस्थापक आहेत. पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव, मास कम्युनिकेशन विभाग समन्वयक डॉ. शिवाजी जाधव उपस्थित होते.