आयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषद
schedule29 May 26 person by visibility 24 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकौंटंटस् ऑफ इंडिया, कोल्हापूर शाखेतर्फे ३० आणि ३१ मे २०२६ या कालावधीत पुनर्मंथन (इन्कम टॅक्स अॅक्ट 2.0) या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ’ अशी माहिती कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए आशिष सेवेकरी यांनी दिली. सायबर येथील आनंद भवन सभागृह येथे ही राष्ट्रीय परिषद होत आहे.
परिषदेत आयकर कायदा, २०२५ चा आढावा, संक्रमणकालीन तरतुदी, कर आकारणीचा आधार, करनिर्धारण व पुनर्मूल्यांकन, नवीन कायद्यानुसार विविध उत्पन्न प्रकारांचे करप्रावधान, धर्मादाय व ना-नफा संस्थांशी संबंधित तरतुदी, तसेच अपील, स्थगिती आणि पुनर्विलोकन प्रक्रियाया महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सेवेकरी म्हणाले, परिषदेचे उद्घाटन आयसीएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सीए पियुष छाजेड, सीए निहार जंबूसरिया, सीए मंगेश घाणेकर, सीए संजय निकम, सीए अभिषेक धामणे, सीए पियुष चांडक असे केंद्र, प्रादेशिक व शाखेचे आजी माजी सदस्य यांच्यासह शाखेचे पदाधिकारी उपस्थित राहतील. तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष सीए समरजीतसिंह घाटगे, सायबरचे अध्यक्ष सीए रणजितसिंह शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच देशाच्या विविध भागांतील सुमारे ६०० हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्स, करसल्लागार, उद्योग-व्यवसाय प्रतिनिधी आणि वित्त क्षेत्रातील व्यावसायिक या परिषदेत सहभागी होणार असल्याचे सेवेकरी यांनी सांगितले.